मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2025
मुंबई, – गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिला व्यावसायिकाला सुमारे 53 लाखांना गंडा घातल्याप्रकरणी दिनेश रिशपाल चावला या 38 वर्षांच्या आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. दिनेश हा काही सायबर ठगांच्या संपर्कात असून त्यांच्यासाठी त्याने विविध बँक खाती उघडली होती. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा केली जात होती. त्यासाठी इतरांना बँक खाती उघडण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
राणी श्रीराम कहार ही व्यावसायिक महिला मालाड येथे राहत असून तिचा सॉफ्टवेअर डेव्हल्पमेंटचा व्यवसाय आहे. तिचे दोन बँकेत चार बचत आणि चालू खाते असून अनेकदा ती तिचे व्यवहार ऑनलाईन करते. त्यांचा श्रीनिवास नावाचा एक आयटी मित्र असून त्याच्याशी संभाषणादरम्यान त्याने त्यांना एका ट्रेडिंग कंपनीची माहिती दिली होती. या कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास त्यांना भविष्यात चांगला फायदा होईल असे सांगितले होते. त्यानंतर त्याने तिला या कंपनीशी सविस्तर माहिती दिली होती. कंपनीचा एक व्हॉटअप ग्रुप होता, त्यात तिला अॅड करण्यात आले होते. काही दिवसांनी तिला रजिस्ट्ररसाठी एक लिंक पाठविण्यात आली होती. ही लिंक ओपन करुन तिने तिची माहिती तसेच बँक डिटेल्स दिली होती. त्यानंतर तिने श्रीनिवासच्या सांगण्यावरुन कंपनीत टप्याटप्याने गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. काही महिन्यांत तिने कंपनीत सुमारे साठ लाखांची गुंतवणुक केली होती.
या गुंतवणुकीवर तिला कंपनीकडून सव्वासहा लाख रुपये परत करण्यात आले होते. कंपनीच्या वॉलेटमधून तिला कंपनीकडून विविध शेअरमध्ये गुंतवणुक करण्यात आल्याचे आले होते. विशेष म्हणजे या गुंतवणुकीवर तिला प्रचंड फायदा होत होता. यावेळी तिने मूळ रक्कम वगळता तिला झालेल्या नफ्याची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला ती रक्कम ट्रान्स्फर करता आली नाही. याबाबत तिने विचारणा केली असता तिला पैसे काढल्यास त्यांचे क्रेडिट स्कोर कमी होईल. अगदी गरज भासल्यास तिला पैसे काढता येईल, मात्र त्यासाठी तिला नव्वद लाख रुपये जमा करावे लागतील असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तिला 44 लाख रुपये भरण्यास सांगून ही रक्कम जमा केली नाहीतर तिला फेब्रुवारी 2025 पासून तीन टक्के टॅक्स भरावा लागेल. त्यानंतर तिला गुंतवणुक रक्कम काढता येईल असे सांगण्यात आले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने कंपनीबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली. यावेळी तिला संबंधित कंपनी बोगस असल्याचे समजले. या कंपनीने ट्रेडिंगच्या माध्यमातून अनेकांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन कोट्यवधी रुपयांना गंडा घातला होता. तिची गुंतवणुकीच्या नावाने कंपनीने 53 लाख 73 हजार 271 रुपयांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने सायबल हेल्पलाईनसह सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी दिनेश चावलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्यांच्याच सांगण्यावरुन त्याने बँकेत खाती उघडली होती. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. कमिशनची रक्कम वगळता इतर सर्व रक्कम तो सायबर ठगांना पाठवत होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नाव समोर आले आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.