शेअर गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने 47 लाखांना गंडा
संभाजीनगर येथून सायबर ठगाच्या दोन सहकार्यांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 एप्रिल 2026
मुंबई, – शेअर गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने एका खाजगी कंपनीच्या अधिकार्याची सुमारे 47 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी सायबर ठगांच्या संपर्कात असलेल्या दोन आरोपींना उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. इम्रान रफिक शेख आणि अजीम आसिफ शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही संभाजीनगरचे रहिवाशी आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने मंगळवार 14 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांवर सायबर ठगांन मदत करुन त्यांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. त्यांच्या बँक खात्यात अशाच इतर फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे बोलले जाते.
महेश भालचंद्र काळे हे कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजमधील रहिवाशी असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचा स्वतचा एक डिमॅट खाते असून ते गेल्या दहा वर्षांपासून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करतात. त्यांनी डिमॅट खात्यावरुन अनेक खाजगी कंपन्याचे शेअर खरेदी-विक्री केले आहेत. शेअर मार्केटबाबत त्यांचा चांगले ज्ञान आहे. अनेकदा ते सोशल मिडीयावरुन शेअर मार्केटची माहिती जाणून घेत होते. गेल्या वर्षी सोशल मिडीयावर शेअर मार्केटची घेत असताना त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करयण्यात आले होते. त्यात दिडशेहून अधिक सभासद होते. शशिकुमार सिंग हा ग्रुप अॅडमिन होता. त्यात शेअर मार्केटबाबत माहिती देताना कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला फायदा होईल याबाबत सांगितले जात होते.
जवळपास एक महिना त्यांनी ही माहिती जाणून घेऊन त्याची शहानिशा केली होती. त्यात ग्रुपमधील दिलेली माहिती खरी असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रिमिअर ग्रुपमध्ये शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यांना एक लिंक पाठवून आधी रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात आले होते, त्यामुळे त्यांनी रजिस्ट्रेशन करुन 11 डिसेंबर 2025 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत वेगवगळ्या शेअरमध्ये सुमारे 47 लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाला होता, मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बॅक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. वारंवार विनंती करुनही त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यासाठी त्यांच्याकडे वेगवेगळ्या कारणासाठी पैशांची मागणी केली जात होती.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पांचागणे, पोलीस हवालदार रवी पाटील, किरण गवळी, अक्षय साळवे, गणेश कोरे यांनी तपास सुरु केला होता. तपासात फसवणुकीची रक्कम संभाजीनगर येथील एका काही बँक खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित पोलीस पथक संभाजीनगर येथे गेले होते.
या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने इम्रान शेख आणि अजीम शेख या दोघांना ताब्यात घेतले. तपासात इम्रान आणि अजीत हे दोघेही संभाजीनगरचे रहिवाशी असून मजुरीचे काम करतात. ते दोघेही काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकेत खाती ओपन केले होते. या बँक खात्याची माहिती सायबर ठगांना दिल्यानंतर फसवणुकीची ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती.
फसवणुकीसाठी बँक खाती दिल्याने त्यांना फसवणुकीच्या रक्कमेची काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर या तिघांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्यांना रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.