सायबर गुन्ह्यांतील फसवणुकीची तीनशे कोटीची रक्कम गोठविण्यात यश
आठ महिन्यांत 113 कोटी 86 लाख 78 हजार 828 रुपये फ्रिज
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 ऑगस्ट 2025
मुंबई, – सायबर सेल हेल्पलाईन सुरु झाल्यानंतर शेअर ट्रेडिंग-गुंतवणुक, डिजीटल अरेस्ट, ऑनलाईन टास्क व शॉपिंग, लोन आणि नोकरी आदी सायबर गुन्ह्यांतील फसवणुकीची सुमारे तीनशे कोटीची रक्कम विविध बँक खात्यात गोठविण्यात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे. तसेच गेल्या आठ महिन्यांत याच पथकाने विविध गुन्ह्यांतील 113 कोटी 86 लाख 78 हजार 828 रुपये फ्रिज केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले 11 हजार 63 मोबाईल ब्लॉक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन वर्षांत तीनशे कोटी तर आठ महिन्यांत एकशे तेरा कोटीची रक्कम गोठविण्यात यश मिळविणार्या सायबर सेल पोलीेस अधिकारी आणि कर्मचार्यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.
गेल्या काही दिवसांत ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. शेअर टे्रडिंगह गुंतवणुक, डिजीटल अरेस्ट, ऑनलाईन टास्कसह शॉपिंग, लोन आणि जॉबच्या नावाने अनेकांना गंडा घातला जात आहे. अशा फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सेल पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी विशेष मोहीम सुरु करुनही फसवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे 17 मे 2022 रोजी मुंबई पोलिसांनी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच फसवणुकीची रक्कम तातडीने हालचाल करुन गोठविण्यासाठी 1930 क्रमांकाची हेल्पलाईन सेवा सुरु केली होती. या हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधल्यास एनसीआरपीपोर्टलवर तक्रार करुन नागरिकांची फसवणुक झालेली रक्कम संबंधित बँक खात्यांवर गोठविण्यात येत होते.
ही हेल्पलाईन सेवा सुरु झाल्यानंतर आतापर्यंत विविध फसवणुकीचे 13 लाख 19 हजार 403 कॉल पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सायबर फसवणुकीबाबत 1 लाख 31 लाख 273 तक्रारीचा समावेश होता. या तक्रारी नंतर एनसीपीआर पोर्टलवर नोंदविण्यात आले. त्यात शेअर ट्रेडिंग, गुंतवणुक फ्रॉड, डिजीटल अरेस्ट फ्रॉड, ऑनलाईन टास्क, शॉपिंग फ्रॉड, लोन फ्रॉड आणि जॉब फ्रॉड आदी तक्रारीचा समावेश होता. या तक्रारी प्राप्त होताच सायबर सेल पोलिसांनी संबंधित बँक, वॉलेट आणि मर्चंट आदी नोंडल अधिकारी यांच्याशी समन्वय साधून, फॉलोअप घेऊन फसवणुक रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली आहे, त्या बँक खात्यावर फ्रिज करण्याची कारवाई केली होती.
1 जानेवारी ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत नागरिकांची सायबर गुन्हयांमध्ये फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी 113 कोटी 86 लाख 78 हजार 828 रुपये विविध बँक खात्यात गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच 17 मे ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत या तीन वर्षांत सायबर सेलने सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील 302 कोटी 5 लाख 88 हजार 092 रुपयांची रक्कम विविध बँक खात्यात फ्रिज केली आहे. जानेवारी 2024 ते जुलै 2025 या कालावधीत विविध सायबर गुन्ह्यांत मोबाईल क्रमांकाची पडताळणी करुन आतापर्यंत 11 हजार 063 मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, ोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वनाथ कोळेकर, इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर व अन्य पोलीस पथकाने केली.