पार्टटाईम जॉबसह गुंतवणुकीच्या नावाने दोघांची फसवणुक
३८ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जून २०२४
मुंबई, – पार्टटाईम जॉबसह शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने दोन व्यक्तींची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे ३८ लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार अंधेरीतील चांदवली, म्हाडा कॉलनीत राहत असून एका खाजगी बँकेत कामाला आहेत. जानेवारी महिन्यांत त्यांना निशा शर्मा नावाच्या एका तरुणीचा कॉल आला होता. तिने त्यांना पार्टटाईम जॉबची ऑफर देताना विविध कंपनीच्या टास्क पूर्ण केल्यानंतर चांगले कमिशन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना युट्यूब चॅनेल सबस्क्राईप करायचे होते, टास्क पूर्ण होताच त्यांच्या बँक खात्यात युपीआयद्वारे पैसे ट्रान्स्फर होणार होती. त्यामुळे त्यांनी तिला होकार दिला. त्यानंतर तिने त्यांना काही लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्यास सांगितले. ते टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रत्येक टास्कमागे दिडशे रुपये मिळत होते. याच दरम्यान त्यांना जास्त कमिशनचे आमिष दाखवून प्रिपेड टास्क देण्यात आले होते. त्यासाठी त्यांना एका लिंकद्वारे रजिस्ट्रेशन करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. जास्त कमिशनच्या आमिषाला बळी पडून त्यांनी निशा शर्मा, रेश्मा भानुशाली, साक्षी अवन्या आणि अर्जुन राठोड यांच्या सूचनेनुसार विविध प्रिपेड टास्कवर २० लाख ५५ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र त्यांना गुंतवणुकीवर कुठलाही परतावा देण्यात आला नाही. विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना काही प्रतिसाद मिळाला नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईन १९३० क्रमांकासह सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या गुन्ह्यांत ५३ वर्षांच्या तक्रारदाराची अज्ञात सायबर ठगांनी १७ लाख ६७ हजाराची फसवणुक केली. तक्रारदार जोगेश्वरी परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा मोबाईल क्रमांक एका व्हॉटअप ग्रुपवर ऍड करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये शेअरसंदर्भात माहिती देऊन सभासदांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले जात होते. कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल याची मिळत असल्याने त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांना ग्रुपच्या ऍडमिनने एक लिंक पाठवून त्याद्वारे त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्यांनी विविध शेअरवर १७ लाख ६७ हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे एका ऍपवरुन दिसत होते. अलीकडेच त्यांनी त्यांच्या शेअरची विक्रीसंदर्भात ऍडमीनशी चर्चा केली होती. यावेळी त्यांना वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करावी लागेल असे सांगण्यात आले. नंतर त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अशा प्रकारे ग्रुप ऍडमिनने शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगून त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक केली होती. या दोन्ही घटनेनंतर सायबर सेल पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसंानी सांगितले.