नवाब मलिक यांच्या नावाने वयोवृद्धाची २० लाखांची फसवणुक
मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून पैशांचा अपहार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अजीत पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांच्या नावाचा गैरवापर करुन एका ८१ वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगाने सुमारे २० लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. त्यांच्या आधारकार्डवरुन बँक खाती उघडून त्यात बेकायदेशीर व्यवहार म्हणजे मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप करुन या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून पैशांचा अपहार करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध तोतयागिरी करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
८१ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार सुभाष चंद्रा के शाह हे माटुंगा येथे त्यांच्या पत्नीसोबत राहतात. ते रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीतून उपाध्याक्ष म्हणून निवृत्त झाले आहे. १९ जुलैला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना सचिन पाटील नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने तो अंधेरी ईस्ट पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध अंधेरीतील लोकल कोर्टात केस सुरु आहे. त्यांच्या नावाने एका बँकेत खाते उघडण्यात आले होते. त्यात २५ लाखांचे बेकायदेशीर व्यवहार झाला होता. त्याचीच ती केस असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांचे संबंधित बँकेत खाते नसल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रदीप सावंत यांच्याशी बोलण्यास सांगून तो कॉल ट्रान्स्फर केला होता. यावेळी व्हॉटअपवर मुंबई पोलिसांचा लोगो असलेला आयडीचा फोटो आणि पोलीस युनिफॉर्ममध्ये असलेला एका व्यक्तीचा फोटो दिसून आला. त्याने तो प्रदीप सावंत बोलत असल्याचे सांगून तुमचे आधारकार्ड कुठे गहाळ झाले होते का याबाबत विचारणा केली. त्यांनी नाही सांगितल्यानंतर त्याने त्यांना संबंधित खात्यात २५ लाखांचा व्यवहार झाला असून ते बँक खाते तुमच्या नावाने उघडण्यात आले होते. त्यामुळे तुम्ही पोलीस उपायुक्त मिलिंद भारांबे साहेबांशी बोला असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी मिलिंद भारांबे नावाच्या व्यक्तीने संभाषण करुन त्यांची सुमारे तीन तास व्हिडीओ कॉलच्या माध्यामून चौकश केली. यावेळी त्याने कॉल बंद करु नका तसेच ही माहिती कोणालाही सांगू नका अशी सक्त ताकिद दिली होती.
यावेळी समोरील व्यक्तीने त्याचा कॅमेरा बंद ठेवला होता, त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्यांचे सहकारी मोहम्मद इस्माईल मलिक हा मुंबईत मनी लॉड्रिंग करत असून त्याने विविध बँकेत तीनशेहून खाती उघडले आहे. या खात्यात मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमा झाला आहे. त्यातील पंधरा टक्के कमिशनची रक्कम त्यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बँक खात्यात जमा झाले आहेत. याप्रकणी मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या लेटरहेडवर मिलिंद भारांबे, नितीन पाटील, जॉर्ज मॅथ्यू यांच्या नावाने एक नोटीस पाठविण्यात आली होती. या प्रकाराने ते प्रचंड घाबरले आणि या गुन्ह्यांची त्यांचा काहीही संबंध नाही असे सांगू लागले. यावेळी त्यांनी तुम्ही घराबाहेर पडू नका, मंत्री नवाब मलिकचे गुंड तुम्हाला मारण्यासाठी घराजवळ पाळत ठेवून आहे. त्यामुळे तुमच्या जिवाला धोका आहे. त्यानंतर काही वेळाने त्यांना पुन्हा संंबंधित व्यक्तीचा फोन आला. त्यांना अटक न करण्यासाठी व्हेरीफिकेशनसाठी काही रक्कम जमा करावी असे सांगण्यात आले. व्हेरीफिशननंतर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा जमा केली जाईल असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना काही बँक खात्याची डिटेल्स पाठविली होती.
या बँक खात्यात त्यांनी वीस लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्यांना कोणाचेही कॉल आले नाही. घडलेला प्रकार त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितला. यावेळी या मित्राने त्यांची सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे सांगून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. या प्रकारानंतर त्यांनी मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमधील अधिकार्यांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध ३४० (२), ३३६ (२), (३), ३१९ (२), ३१८ (४), ३०८ (२), ३ (५), २०४ भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (डी), ६६ (सी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईसह इतर शहरात अशाच प्रकारे काही गुन्ह्यांची नोंद झाली असून या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे सायबर सेल पोलिसांना संबंधित आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.