सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या बिहारी टोळीचा पर्दाफाश
बोगस आधारकार्ड-पॅन बनवून बँकेत खाती उघडल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – बोगस आधारकार्ड-पॅनकार्ड बनवून विविध बँक खात्यात खाती उघडून झारखंडच्या जामतारा सायबर ठगांना ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणार्या एका बिहारी टोळीचा माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी मुख्य आरोपीसह सहाजणांना अटक केली आहे. उमेशकुमार सुदर्शन पासवान, राहुलकुमार संजयकुमार वर्मा, अमनकुमार दिलीप प्रसाद, अनिस ऊर्फ राजकुमार विजेंद्रसिंग बहादूरसिंग, मुकेशकुमार ऊर्फ चंदू उमेश चंद्रवशी आणि अब्दुल्ला सोहरबमियाँ अन्सारी अशी या सहाजणांची नावे असून ते सर्वजण बिहारचे रहिवाशी आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी 83 बोगस आधाकार्ड आणि पॅनकार्ड, बँक ऑफ महाराष्ट्रचे बोगस पाच पासबुक, बँकेचे सात डेबीट कार्ड, विविध कंपनीचे गुन्ह्यांत वापरलेले नऊ मोबाईल आणि मोठ्या प्रमाणात सिमकार्डचा साठा जप्त केला आहे. या टोळीने विविध शासकीय आणि खाजगी बँकेत खाती उघडले असून ते सर्व बँक खाती बंद करण्यात आले आहेत.
मुंबई शहरात बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून काहीजण या बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या मदतीने विविध बँकेत खाती उघडत आहे. या बोगस बँक खात्याचा वापर काही सायबर ठगांकडून फसवणुकीसाठी वापर होत असल्याची माहिती माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांना तपास करुन संबंधित दोषी आरोपीविरुद्ध सक्त कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, पोलीस निरीक्षक फरीद खान, वासंती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनेश सातार्डेकर, पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस हवालदार धादवड, तावडे, हाके, घाग, पवार, राठोड यांनी तपास सुरु केला होता.
आरोपींचा शोध सुरु असताना या गुन्ह्यांतील काही आरोपी फोर्ट येथील शहिद भगतसिंग रोड, शीफ डॉमेटरीजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत तीन संशयिताना ताब्यात घेतले होते. या आरोपींकडून पोलिसांनी काही बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड जप्त केले होते. याबाबत चौकशी केल्यानंतर बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनविणारी ही एक टोळी असल्याचे उघडकीस आले. या टोळीने गुगलवरुन प्रिंट पोंरर्टल हे पेड अॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनविल्याची कबुली होती. याच कागदपत्रांवरुन त्यांनी काही शासकीय आणि खाजगी बँकेत बचत खाते उघडले होते. या बँक खात्याची माहिती ऑनलाईन फसवणुक करणार्या झारखंडच्याच्या देवघर येथील प्रसिद्ध जामतारा सायबर ठगांना दिली होती. त्यानंतर फसवणुकीची ही रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली जात होती. याकामी या आरोपींना संबंधित सायबर ठगांकडून ठराविक रक्कमेचे कमिशन दिले जात होते. तपासात त्यांनी सायबर ठगांना बँक खाती विकल्याची कबुली दिली आहे.
याच बँक खात्यात आतापर्यंत ऑनलाईन फसवणुकीची कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आले होते. त्यानंतर या पथकाने बिहार आणि झारखंड राज्यातून त्यांच्या तीन सहकार्यांना अटक केली होती. सहाही आरोपी बिहारच्या जाहानाबाद, पटना आणि देवधरचे रहिवाशी आहे. यातील उमेशकुमार ट्रकचालक, अमनकुमार रिक्षाचालक, राहुलकुमार कापड व्यापारी, अनिस हा कॉलेज विद्यार्थी आहे तर मुकेशकुमार हा काहीच कामधंदा करत नाही. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल, सिमकार्ड, पासबुक आणि बँकेचे डेबीट कार्ड जप्त केले आहे.
ही टोळी मोबाईल अॅपच्या वापर करुन अॅमेझॉन, फिल्पकार्ड, पंतप्रधान किसान योजना आदी योजनांचा फायदा घेऊन तुमचे पैसे अडकले आहे, ते मिळवून देतो असे सांगून लोकांची फसवणुक करत होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या आरोपींनी विविध बँकेत सुरु असलेले बँक खात्यात बंद करण्यात आले असून या बँक खात्यातील सर्व आर्थिक व्यवहार थांबविण्यात आले आहेत.