क्रिप्टो करन्सीच्या गुंतवणुकीच्या आमिषाने प्राध्यापकाची फसवणुक

1.96 कोटींना गंडा घालणार्‍या सायबर महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 जुलै 2025
मुंबई, – क्रिप्टो करन्सीच्या गुंतवणुकीच्या आमिषाने एका वयोवृद्ध निवृत्त प्राध्यापकाची दोन सायबर ठग महिलांनी 1 कोटी 96 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आयशा आणि कोयल नाव सांगणार्‍या दोन्ही सायबर ठग महिलांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पश्चिम प्रादेशिक सायबर सेल विभागाकडून सुरु आहे.

64 वर्षांचे तक्रारदार सांताक्रुज येथे राहत असून 2016 साली ते एका नामांकित कॉलेजमधून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. ऑगस्ट 2023 रोजी त्यांची सोशल मिडीयावर आयशा नाव सांगणार्‍या एका महिलेशी ओळख झाली होती. तिने ती दिल्लीतील गुरगावची रहिवाशी असून ग्लोबल आर्ट कंपनीत वरिष्ठ अधिकारी पदावर काम करत असल्याचे सांगितले होते. याच दरम्यान त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही व्हॉटअप आणि कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी होणार्‍या संभाषणात तिने त्यांना क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती. क्रिप्टो करन्सीसह बिटकॉईनची माहिती सांगून ती त्यांना त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करत होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला मोबदला मिळून देईल.

त्यांचा विश्वास बसावा म्हणून तिने त्यांना इतरांनी केलेली गुंतवणुक, त्यातून त्यांना झालेला फायदा असे काही स्क्रिनशॉट पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी क्रिप्टो करन्सीसह बिट कॉईनमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. तिला ईमेल आयडी आणि आधारकार्डची माहिती दिल्यानंतर त्यांनी तिने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात काही रक्कम गुंतवणुक केली होती. ही रक्कम गुंतवणुक केल्यांनतर तिने त्यांच्याशी अचानक संपर्क करणे बंद केला होता.

15 जुलैला त्यांना कोयल नाव सांगणार्‍या अन्य एका महिलेने कॉल करुन त्यांनी गुंतवणुक केलेली रक्कम परत करणार असल्याचे सांगितले. तिने त्यांचे नाव आणि बँक खात्याची डिटेल्स घेतली. त्यांना पाच ते सहा दिवसांत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. दुसर्‍या दिवशी तिने त्यांना कॉल करुन ही रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी काही प्रोसेस करावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून पैशांची मागणी सुरु केली होती. विविध कारण सांगून तिने त्यांना पुन्हा वेगवेगळ्या बॅक खात्यात पैसे भरण्यास प्रवृत्त केले होते.

अशा प्रकारे ऑगस्ट 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत आयशा आणि कोयल या दोन महिलांनी क्रिप्टो करन्सी, बिट कॉईनसाठी गुंतवणुक करण्यास तसेच नंतर गुंतवणुक रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून 1 कोटी 93 लाख रुपये घेतले होते. मात्र कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पश्चिम प्रादेशिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कोयल आणि आयशा या दोन्ही महिलांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यात संबंधित आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page