राजू परुळेकर
मुंबई, – शेअर ट्रेडिंग व्यवसायातील एका नामांकित खाजगी कंपनीची बोगस वेबसाईट बनवून कंपनीसह कंपनीच्या ग्राहकांची फसवणुक करणार्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या चारही सायबर ठगांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. आशिष धनजीभाई घंटाला, संजयभाई अमृतभाई पटेल, आयुज कवज गलहोत्रा आणि कवज रमेश गलहोत्रा अशी या चौघांची नावे आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत आहे. या चौघांनी बोगस वेबसाईटच्या माध्यमातून आतापर्यंत कंपनीच्या ग्राहकांशी संपर्क साधून त्यांची किती रुपयांची फसवणुक केली आहे याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिपीका विनोदकुमार सिंघवी ही महिला गोरेगाव येथे राहत असून ती चॉईस इक्वीटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करते. तिचे पती सीएन असून तेदेखील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिच्या कंपनीचे मुख्य कार्यालय अंधेरीतील जे. बी नगर परिसरात असून कंपनी सेबीद्वारे नोंदणीकृत आहे. त्यांच्या कंपनीची एक अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ही कंपनी त्यांच्या ग्राहकांना शेअर ट्रेडिंग आणि इतर सोसी पुरविते. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीने अँडॉईड प्ले स्टोअर आणि ऍपल आय स्टोअरवर ऍप उपलब्ध करुन दिले आहेत. त्यासाठी कंपनने प्रत्येक ग्राहकाला युजर नेम आणि पासवर्ड दिला आहे. या ऍपद्वारे त्यांच्या ग्राहकांना शेअर खरेदी-विक्री करता येते.
४ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीच्या लिगल टिमला त्यांच्या कंपनीच्या नावाने हुबेहुब दिसणारी एक वेबसाईट सोशल मिडीयावर असल्याचे दिसून आले. या बोगस वेबसाईटच्या माध्यमातून अज्ञात सायबर ठगाने त्यांच्या कंपनीच्या ग्राहकांशी संपर्क साधून त्यांचा त्यांच्या कंपनीशी करार झाल्याचे भासविले होते. तेच कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांना कंपनीसोबत झालेल्या कॉन्ट्रक्टचे दस्तावेज पाठवून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत होते. अशा प्रकारे या ठगांनी त्यांच्या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात शेअर खरेदीसाठी पैशांची मागणी केली होती. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने त्याची शहानिशा करण्यात आली होती. त्यात या लिगल टिमला सोशल मिडीयावर त्यांच्या कंपनीसारखीच दिसणारी दुसरी बोगस वेबसाईट दिसली होती. त्यांच्या कंपनीशी निगडीत उपलब्ध असलेली सर्व माहिती या बोगस वेबसाईटवर होती. त्यांनीही ग्राहकांसाठी बोगस ऍप ऍड्रॉईड प्ले स्टोअर आणि ऍपल आय स्टोअर बनविले होते.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या वतीने दिपीका सिंघवी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर डिसेंबर २०२३ रोजी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध बोगस दस्तावेजाच्या आधारे कंपनीची बोगस वेबसाईट बनवून त्याद्वारे कंपनीच्या ग्राहकासह कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अंधेरी पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना आशिष घंटाला, संजयभाई पटेल, आयुज गलहोत्रा आणि कवज गलहोत्रा या चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच कंपनीची बोगस वेबसाईट बनवून ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या चौघांनाही पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत अटक केली होती. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.