मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मार्च २०२४
मुंबई, पायलटसह एका व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगांनी ८ लाख ४१ हजाराची ऑनलाईन फसवणुक केली. याप्रकरणी बोरिवली आणि वर्सोवा पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.
६१ वर्षांचे सुनिल प्रेमप्रकाश साहू हे पायलट असून ते अंधेरीतील वर्सोवा, चारबंगला परिसरात राहतात. दोन दिवसांपूर्वी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला होता. या मॅसेजची लिंक ओपन केल्यानंतर त्यांना त्यांच्या बॅकेचे पेज ओपन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्याचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकला होता. त्यानंतर दुसरे पेज ओपन केले होते. याच दरम्यान त्यांना बँकेतून काही ओटीपी प्राप्त झाले होते. ते ओटीपी क्रमांक बँकेच्या पेजवर भरल्यानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख ९० हजार रुपये डेबीट झाले होते. पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. आपण बँकेचे रिलेशनशीप अधिकारी बोलत आहे. तुमच्या खात्यातून १ लाख ९० हजार रुपये डेबीट झाले असून तो व्यवहार तुम्ही केला आहे का अशी विचारणा केली. त्यांनी नकार देत हा व्यवहार रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्याने त्यांच्याकडे दुसर्या ओटीपी क्रमांकाची मागणी केली. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी फोन बंद करुन ही माहिती वर्सोवा पोलिसांना दिली. घडलेला प्रकार सांगून त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तकार केली होती.
दुसर्या घटनेत शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने एका व्यावसायिकाची फसवणुक झाली आहे. ३८ वर्षांचे निलेश शांतीलाल मकवाना हे बोरिवली परिसरात राहत असून त्यांचा इंटेरियल डिझायनिंगचा व्यवसाय आहे. त्यांना शेअर मार्केटमध्ये काही रक्कम गुंतवणुक करायची होती, त्यामुळे ते गुंतवणुकीबाबतची माहिती सर्च करत होते. यावेळी त्यांना व्हॉटअप ग्रुपची एक लिंक आली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना इंडियन स्टॉक मार्केट टिप्स १००१ नावाची एक ग्रुप दिसून आली. त्यात १६५ हून अधिक सदस्य होते. मिनाक्षी कपूर ही ग्रुप ऍडमीन होती. तिने त्यांना ती एका खाजगी कंपनीची मॅनेजर असल्याचे सांगून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे काही स्किम सांगितले होते. त्यासाठी त्यांना गुगल प्ले स्टोरवर एक ऍप ओपन करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ते ऍप ओपन केले. त्यानंतर त्यांना विविध शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास सांगण्यात आले होते. तिच्यावर विश्वास ठेवून तिने सांगितलेल्या अकाऊंटवर पैसे पाठवून त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केल होती. याच दरम्यान मिनाक्षीसह इतर चौघांनी त्यांना आयपीओ मिळवून देण्याचा बहाणा करुन आणखीन पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. अशा प्रकारे त्यांनी २९ जानेवारी ते ७ मार्च या कालावधीत विविध शेअर खरेदीसह शेअरमार्केटमध्ये आयपीओ मिळवून देण्याचा बहाणा करुन साडेसहा लाख रुपये भरण्यास प्रवृत्त केले. मात्र त्यांना कुठलेही शेअर अथवा आयपीओ न देता त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसात तक्रार केली होती. या दोन्ही घटनेनंतर वर्सोवा आणि बोरिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेलचे अधिकारी करत आहेत.