एमडी ड्रग्जच्या गुन्ह्यांत चौकशीच्या बहाण्याने व्यावसायिकाला गंडा
ऍपवरील बँक खात्यात साडेआठ लाख ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची चौकशी सुरु असल्याची बतावणी करुन बँक खात्यातील साडेआठ लाखांची कॅश ऍपवरील खात्यात जमा करण्यास प्रवृत्त करुन एका व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून ओशिवरा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या ठगाने आपण पोलीस उपायुक्त प्रदीप सावंत बोलत असल्याचे सांगून ही फसवणुक केल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही अशाच प्रकारचे काही गुन्हे घडल्याची नोंद असून फसवणुक करणारी एक सराईत टोळी असल्याचे बोलले जाते.
४६ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहतात. त्यांचा वसई येथे इंडस्ट्रियल गुड्स सप्लायचा व्यवसाय आहे. शनिवारी ते त्यांच्या कार्यालयातून घरी येत होते. बांगुरनगर मेट्रो स्टेशनजवळ येताच त्यांना एका अज्ञात मोबाईलवरुन कॉल आला होता. समोरील व्यक्तीने तो फिडेक्स इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिसमधून बोलत असल्याचे सांगून त्यांचे एक पार्सल आले आहे. त्यात एक समस्या निर्माण झाली आल्याने डिटेल्स जाणून घेण्यासाठी एक क्रमांक डायल करा असे सांगितले. त्यामुळे त्यांनी एक क्रमांक डायल केले. यावेळी तो कॉल कस्टमर केअरला लागला होता. तिथे असलेल्या व्यक्तीने त्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक घेतला. त्यांच्या आधारकार्डवर मरियम फर्नाडिस या नावाने एअरपोर्टला एक पार्सल आले आहे. ते पार्सल कस्टम अधिकार्यांनी बाजूला ठेवून आतील सामानाची तपासणी केली होती. त्यात त्यांना काही कपडे, एक्सपायर पासपोर्ट, चार बँकेचे क्रेडिट कार्ड आणि ७०० ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले आहे.
एमडी ड्रग्ज सापडल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्यानंतर त्यांना पोलीस उपायुक्त प्रदीप सावंत यांच्याशी बोलण्यास सांगण्यात आले. त्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती चेक करायची आहे. त्यामुळे खात्यातील सर्व रक्कम त्यांनी दिलेल्या ऍपवर ट्रान्स्फर करण्यास सांगितले. हा प्रकारामुळे ते प्रचंड घाबरले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यातील साडेआठ लाखांची रक्कम ऍपवरील बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. नंतर त्यांन शंका आली. ड्रग्जचा गुन्हा दाखल झाला असेल तर पोलीस प्रत्यक्षात चौकशी न करता फोनवरुन का चौकशी करतील. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.