सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणार्या दोघांना अटक
सायबर सेलसह बांगुरनगर पोलिसांची कारवाई; दोघांना पोलीस कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जून २०२४
मुंबई, – दुबईसह इतर राज्यात बसून ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणार्या दोन आरोपींना अटक करण्यात दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलसह बांगुरनगर पोलिसांना यश आले आहे. अनुपकुमार कुरिकोटल आणि शैलेश तानाजी गवळी अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अनुपकुमार हा केरळचा रहिवाशी असून तो दुबईतील काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्याने मुंबईसह केरळ शहरात ४२ हून अधिक बँकेत खाती उघडल्याचे तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले. या दोघांच्या अटकेनंतर त्यांच्या अन्य सहकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
७२ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गिरगाव येथील सी. पी टँक, हिरालाल काशिदास भजीयावाला परिसरात राहतात. २६ एप्रिल ते ८ मे २०२४ या कालावधीत त्यांना फेडेक्स कुरिअर कंपनीतून एक कॉल आला होता. त्यांनी पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले असल्याचे सांगून त्यांना एका पोलीस अधिकार्याशी बोलण्यास प्रवृत्त केले होते. नरेश नावाच्या या व्यक्तीने त्यांची ड्रग्जसहीत त्यांच्या नावाने विविध बँकेत खाती उघडण्यात आल्याचे सांगून त्यात कोट्यवधी रुपये जमा झाले आहे. मनी लॉड्रिंगचा हा प्रकार असल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखविण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अन्य एका व्यक्तीने फोन करुन त्यांच्या बँक व्यवहाराची चौकशी सुरु आहे असे सांगून त्यांना विविध बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. अटकेच्या कारवाईला घाबरुन त्यांनी विविध बँक खात्यात सुमारे दिड कोटी रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा जमा होईल असे सांगून त्यांनी ती रक्कम जमा केली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची भेट घेतली. घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी गंभीर दखल घेत त्यांच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरोटे, पोलीस अंमलदार खान, धोत्रे यांनी मशिद बंदर येथून अनुपकुमारला ताब्यात घेतले. चौकशीत अनुपकुमार हा मूळचा केरळच्या कनूरचा रहिवाशी असून तो दुबईतील काही सायबर गुन्हेगारांचा संपर्कात होता. त्यांच्याच सांगण्यावरुन त्याने मुंबईसह केरळच्या विविध बँकेत ४२ हून अधिक बँक खाती उघडली होती. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा केली जात होती. बँकेत जमा झालेली रक्कम तो एटीएममधून काढून दुबईतील गुन्हेगारांना पाठवत होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाने व्यावसायिकाला गंडा घालणारा अटकेत
अन्य एका कारवाईत शैलेश तानाजी गवळी या आरोपीस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. त्याने फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगारांना बँकेत खाती उघडून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील तक्रारदार गोरेगाव येथे राहत असून ते व्यावसायिक आहेत. जानेवारी महिन्यांत त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले होते. त्यात शेअरसंदर्भातील माहिती अपलोड करुन ग्रुपच्या ऍडमिनने शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये सहा लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर त्यांना कुठलाही परतावा मिळाला नाही किंवा गुंतवणुक केलेली रक्कमही परत मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी बांगुरनगर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शैलेश गवळी याला ओशिवरा येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे उघडकीस आले. त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम जमा झाली होती.