कंबोडिया देशात कार्यरत असलेल्या सायबर टोळीचा पर्दाफाश

११० बँक खाती उघडून तीस कोटीची फसवणुक झाल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० फेब्रुवारी २०२५
मुंबई, – कंमोडिया देशात कार्यरत असलेल्या एका सायबर टोळीचा गावदेवी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी बारा आरोपींना सोलापूर, नवी मुंबई, गोवा आणि पंजाब येथून अटक करण्यात आली आहे. राजेंद्र भगीरथ सिंग ऊर्फ कुन हॅश, रोमन रेगीन्स ऊर्फ प्रविण दत्तू लोंढे, संदीप विष्णूकांत काकडे ऊर्फ पप्पू, आदित्य महेंद्र कुलकर्णी, अतुल राजेंद्र कोळी, फजलेरसुल अहमद, पियुष प्रकाश अग्रवाल, नामदेव विष्णू काळे ऊर्फ तात्या, शिवाजी साहेबराव साळुंके, गुरुविंदर बलविंदर सिंग, सागर ऊर्फ केशव शंतजय कुलकर्णी आणि दर्शन भगवान म्हात्रे अशी या बाराजणांची नावे आहेत. या टोळीने गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने आतापर्यंत मुंबईसह महाराष्ट्र, दिल्ली, कोलकाता, गोवा आणि गुजरात राज्यात अनेकांना कोट्यवधी रुपयांची फसवणुक केली होती. आतापर्यंत ११० बँक खाती उघडून सुमारे तीस कोटीची फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गेल्या वर्षी गावदेवी परिसरातील एका ७४ वर्षांच्या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केली होती. गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्‍वासन त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. मात्र मूळ रक्कमेसह परतावा रक्कम न देता त्यांची फसवणुक झाली होती. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदार वयोवृद्धाने गावदेवी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त सुमन चव्हाण यांनी गंभीर दखल घेत गावदेवी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ कोळेकर, पोलीस निरीक्षक राजीव पाटील, महिला पोलीस निरीक्षक सारीका कोडापे, स्पेशल सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पंकज होले, विशाल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक गोकुळ खैरनार, पोलीस हवालदार मुन्ना सिंग, पोलीस शिपाई राहुल थोरात, निलेश खुडे, संतोष कचरे, पुंजराम गाडेकर, गणेश जगदेव, अशोक पाटील आणि महिला पोलीस शिपाई श्रद्धा कदम यांनी तपासाला सुरुवात केली होती. या पथकाने सोलापूर येथील मोहोळ येथून नऊ, नवी मुंबईच्या खारघर, गोवा आणि पंजाब येथून प्रत्येकी एक अशा बाराजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

या आरोपींची चौकशी केली असता त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. गुंतवणुकीवर चांगला परवाता देतो असे सांगून या टोळीने आतापर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. फसवणुकीची रक्कम मोहोळ येथे राहणार्‍या केशव कुलकर्णीच्या बँक खात्यात जमा झाली होती. ही रक्कम नंतर पंजाब येथून काढण्यात आली होती. त्यानंतर ती रक्कम क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून कंम्बोडिया येथे पाठविण्यात आली होती. अटक आरोपींनी विविध बँकेत खाती उघडून या खात्याची माहिती चिनी वशांना सायबर ठगांना पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. संबंधित सायबर ठग तेथून टोळीचे सूत्रे हलवत होते.

अटक आरोपींच्या चौकशीतून आतापर्यंत ११० बँक खातीची माहिती मिळाली असून त्यात तीस कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. या बँक खात्यावर देशभरात ५०९ सायबर तक्रारीबाबात एनसीसीआरपीच्या तक्रारी प्राप्त झाले आहे. या आरोपीविरुद्ध मुंबईसह महाराष्ट्र, दिल्ली, कोलकाता, गुजरात, आणि गोवा येथे अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. राजेंद्र नामदेव कंम्बोडिया देशात गेला होता. तिथे त्याने काही सायबर ठगांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने इतराच्या मदतीने विविध बँक खाती उघडले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती असे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page