गॅस कनेक्शनसह इलेक्ट्रीसिटी अपडेटच्या बहाण्याने गंडा

वयोवृद्धांच्या तक्रारीवरुन अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2026
मुंबई, – गॅस कनेक्शनसह इलेक्ट्रीसिटी अपडेटच्या बहाण्याने दोन वयोवृद्धांची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे 38 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पश्चिम सायबर सेल पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन या ठगांचा शोध सुरु केला आहे. दोन्ही गुन्ह्यांत सायबर ठगांनी बोगस एपीके फाईल पाठवून तक्रारदार वयोवृद्धांच्या बँक खात्याची माहिती काढून ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधित बँक खात्यासह खातेदारांच्या माहिती काढून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पहिल्या गुन्ह्यांतील 72 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार रंगराज राव हे त्यांच्या पत्नीसोबत अंधेरीतील लोखंडवाला, सुंदरवन कॉम्प्लेक्स परिसरात राहतात. एअर इंडियामधून ते संचालक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचे एका खाजगी बँकेत संयुक्त बचत खाते आहे. 22 मार्चला ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांना एक मॅसेज आला होता. त्यात त्यांचे गॅस कनेक्शन रात्री उशिरापर्यंत बंद होणार होणार असून तातडीने एमजीएल अधिकारी राजेंद्र प्रसाद यांना संपर्क साधा असे नमूद केले होते. त्यामुळे त्यांनी महानगर गॅसचे अधिकारी राजेंद्र प्रसाद यांना संपर्क साधून विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांचे गॅस कनेक्शनचे बिल अपडेट नसून तातडीने बिल अपडेट करा असे सांगितले. बिल अपडेटसाठी त्याने त्यांच्या व्हॉटअपवर एपीके फाईल पाठविली होती.

ही फाईल ओपन केल्यानंतर त्यात महानगर गॅस लिमिटेडचा लोगो होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यात त्यांची तसेच गॅसशी संबंधित माहिती अपलोड केली होती. यावेळी त्यांना अपडेटसाठी बारा रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही रक्कम ट्रान्स्फर झाली नाही. काही वेळात त्यांना त्यांच्या मोबाईलवर बँकेचे ओटीपी आणि पैसे डेबीट झाल्याचे मॅसेज येऊ लागले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बँकेत संपर्क साधून त्यांचे सर्व पेमेंट थांबविण्याची विनंती केली होती.

त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील स्टेटमेंटची पाहणी केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन 7 लाख 87 हजार 799 व 4 लाख 20 हजार 154 रुपये तर डेबीट कार्डवरुन 93 हजार रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. अशा प्रकारे राजेंद्र प्रसाद नावाच्या अज्ञात ठगाने गॅस कनेक्शन बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांना बोगस एपीके फाईल पाठवून त्यांच्या बँक खात्यातील तपशील जाणून घेऊन सुमारे तेरा लाखांची ऑनलाईन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पश्चिम सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.

दुसर्‍या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला 78 वर्षांची असून ती अंधेरीतील चार बंगला परिसरात राहते. तिचे दोन्ही मुले अमेरिकेत नोकरी करत असून तिथेच वास्तव्यास आहे. 10 मार्चला तिने टाटा पॉवरच्या अंधेरीतील कार्यालयात जाऊन टाटा पॉवर इलेक्ट्रीसिटी बिल तिच्या नावावर करण्यासाठी एक अर्ज दिला होता. त्यानंतर ती तिच्या नातेवाईकांच्या केरळ येथील घरी निघून गेली होती.

20 मार्चला तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो टाटा पॉवर इलेक्ट्रीसिटीमधून बोलत असल्याचे सांगून तिचे मीटर बदलण्यासाठी तिला तेरा रुपये जमा करावे लागतील असे सांगितले. तिने ती केरळ येथे नातेवाईकाकडे आल्याचे सांगताच त्याने तिला ऑनलाईन पेमेंट करण्याचा सल्ला दिला होता. फोन सुरु असताना त्याने तिला केवायसी आणि टाटा पॉवर इलेक्ट्रीसिटी बिल अपडेट करण्यासाठी एक एपीके फाईल पाठविली होती.

त्याच्या सांगण्यावरुन तिने ती फाईल ओपन केली. त्यानंतर तेरा रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यासाठी त्याने तिच्या बँक खात्यासह पीआयएन एक्सपायरी तारीख, सीव्हीही कोड घेतले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने ती सर्व माहिती त्याच्यासोबत शेअर केले होते. ही माहिती दिल्यानतर तिच्या बँक खात्यातून काही पैसे डेबीट होत असल्याचे मॅसेज येऊ लागले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्याचे फोन कट केले. 21 मार्चला ती मुंबईत आली आणि तिने बँकेत जाऊन तिच्या बँक खात्यातील सर्व व्यवहार बंद करण्याची विनंती केली होती.

बँकेचे स्टेटमेंट पाहिल्यानंतर अज्ञात सायबर ठगाने बोगस व्हॉटअप क्रमांकाच्या माध्यातून तिच्या बँक खात्यातून सुमारे 25 लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने सायबर हेल्पलाईनसह पश्चिम सायबर सेल पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी पश्चिम सायबर सेल पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page