मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – मौजमजेसाठी महागड्या सायकली चोरणार्या एका रेकॉर्डवरील आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. अजीज उन्ना खान असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चौदा महागड्या सायकली जप्त केल्या आहेत. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
गेल्या काही महिन्यांत पश्चिम उपनगरातील खार आणि सांताक्रुज परिसरात सोसायटीमध्ये पार्क केलेल्या महागड्या सायकली चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या वाढत्या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सांताक्रुज पोलिसांना तपास करुन आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त महेश मुगुटराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार सावंत, फाटक, गावडे, चिल्ला पाटील, यादव यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका फुटेजमध्ये अजीज खान हा सायकल चोरी करुन पळून जात असल्याचे दिसून आला. त्यानंतर या पथकाने साध्या वेशात पाळत ठेवून अजीजला सांताक्रुज येथील हसनाबाद परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने सायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चौदाहून अधिक महागड्या सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
अजीजला झटपट श्रीमंत व्हायचे होते. त्यामुळे तो दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस सोसायटीमध्ये पार्क केलेल्या महागड्या सायकली चोरी करत होता. या सायकली कमी किंमतीत विक्री करुन तो मौजमजा करत होता. त्याच्याविरुद्ध खार आणि सांताक्रुज पोलीस ठाण्यात सायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.