खंडणीच्या गुन्ह्यांत गॅगस्टर डी. के रावसह सातजणांना अटक

हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटीच्या खंडणीसाठी धमकी

0

हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटीच्या खंडणीसाठी धमकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – शहरातील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी छोटा राजन टोळीशी संबंधित असलेला गॅगस्टर रविंद्र मल्लेश बोरा ऊर्फ डी. के राव याच्यासह नऊजणांविरुद्ध एअरपोर्ट पोलिसांनी गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत गुरुवारी सातजणांना पोलिसांनी अटक केली. त्यात डी. के राव याच्यासह अबूबकर अब्दुल्ला सिद्धीकी, इम्रान कलीम शेख, रियाज कलीम शेख, आसिफ सत्तन खान ऊर्फ आसिफ दरबार, जावेद जलालउद्दीन खान आणि हनीफ इस्माईल नाईक ऊर्फ अन्नूभाई यांचा समावेश आहे. अटकेनंतर या सातजणांना किल्ला कोर्टाने ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अब्दुल्ला हसन अबू आणि फारुखसह इतरांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

अंधेरी येथे राहणारे ७४ वर्षाचे तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचा एम्पायर इंजिनियरिंग कार्पोरेशन नावाची एक इंजिनिरिंग कंपनी होती. २०१६ रोजी त्यांना अब्दुल्ला आबूने हॉटेल सुरु करण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला चांगला वाटल्याने त्यांच्यात हॉटेलबाबत सविस्तर चर्चा सुरु झाली. २०१७ रोजी त्यांच्यात एक एमओयू झाला होता. या हॉटेलच्या बांधकामासाठी फारुखला सांगण्यात आले होते. त्यासाठी त्याने बांधकामासाठी सत्तर लाख रुपये दिले होते. ते हॉटेल अब्दुल्लाला चालविण्याचे ठरले होते. एप्रिल २०१९ रोजी हॉटेलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अब्दुल्ला, त्यांचा मुलगा अबूबकर यांच्यासोबत पाच वर्षांसाठी हॉटेल चालविण्याचा करार केला होता. त्यात ५० लाख रुपये डिपॉझिट आणि दरमाह दोन लाखांचा भाड्याचा उल्लेख होता. मात्र कराराप्रमाणे त्यांनी त्यांना डिपॉझिटसह भाडे दिले नाही. तरीही ते दोघेही हॉटेल चालवत होते. फेब्रुवारी २०२१ रोजी अब्दुल्लाने त्यांच्या पत्नीला भाड्याची रक्कम घेण्यासाठी वांद्रे येथील लोकल कोर्टाजवळ बोलाविले होते. तिथे त्याने एका नोटरीवर तिची सही आणि अंगठ्याचा ठसा घेतला होता.

मात्र त्यांनी तिला भाड्याची रक्कम दिली नाही. या प्रकारानंतर ते सतत त्यांच्याकडे भाड्याची मागणी करत होते. मात्र त्यांनी त्यांना भाडे दिले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. त्यांनी अब्दुल्लाकडे हॉटेलचा ताबा मागितला होता. याच दरम्यान या दोघांनी ते हॉटेल हडप करण्यासाठी बोगस दस्तावेज तयार केले होते. इतकेच नव्हे तर त्यांना हॉटेलमध्ये मज्जाव केला होता. तसेच त्यांच्याकडून त्यांना सतत धमकी दिली जात होती. याच दरम्यान त्यांनी त्यांच्याकडे हॉटेल विक्रीचा प्रस्ताव ठेवला होता. या दोघांकडून भाडे मिळत नसल्याने त्यांनी हॉटेल विक्रीचा निर्णय घेतला होता. यावेळी या दोघांनी त्यांच्याकडून हॉटेल विक्रीतून त्यांना ५० टक्के हिस्सा द्यावा लागेल अशी धमकी दिली होती. मात्र हॉटेलची विक्रीची किंमत जास्त असल्याने हॉटेल खरेदीसाठी कोणीही इच्छुक येत नव्हते. याच दरम्यान अब्दुल्लाने त्यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात वांद्रे येथील लोकल कोर्टात एक सिव्हील केस दाखल केली होती. या केसबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती.

२०२३ रोजी कोर्टाचे समन्स प्राप्त झाले होते. यावेळी त्यांना या दोघांनी त्यांच्या पत्नीचे नोटरीवर स्वाक्षरी आणि अंगठा घेऊन तिच्यावर फसवणुकीची केस दाखल करुन तिने आतापर्यंत त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपये घेतल्याचे नमूद केले होते. अब्दुल्ला आणि अबूबकर यांनी कोर्टात सादर केलेले सर्व दस्तावेज बोगस होते, त्यामुळे मार्च २०२४ रोजी त्यांनी त्यांच्याविरुद्ध वांद्रे कोर्टात या दोघांविरुद्ध तक्रार करणारी एक याचिका सादर केली होती. याच दरम्यान या दोघांनी ते हॉटेल दुसर्‍याच व्यक्तींना भाड्याने दिले होते. हॉटेलच्या लवकरात लवकर सेटलमेंट नाहीतर इम्रान शेख हा गुंड प्रवृत्तीशी संबंधित आहे. त्याचे काही गुंड टोळ्याशी चांगले संबंध आहे. तो तुमचा कधी आणि कुठे गेम करेल सांगता येणार नाही अशी धमकी दिली. याबाबत त्याने सेटलमेंटसाठी सहारा हॉटेलमध्ये एक बैठक बोलाविली होती. या बैठकीत डी. के राव स्वत इतर आरोपीसोबत हजर होता. या संपूर्ण मॅटरमध्ये माझा सहभाग असून आपण जे बोलू तेच तुम्हाला करावे लागेल अशी धमकी देत त्याने त्यांच्याकडे अडीच कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांचा जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी मुक्तार शेखने त्यांना डी. के राव एक गॅगस्टर असून त्याच्याविरुद्ध मर्डरसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची प्रचंड दहशत असून त्याचे ऐकले नाहीतर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना तसेच त्यांना मदत करणार्‍यांना प्रचंड महागात पडेल अशी भीती घातली होती.

या प्रकाराने ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. घडलेला प्रकार त्यांनी विमानतळ पोलिसांना सांगून डी. के रावसह इतर आठजणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या सर्व आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला होता. या गुन्ह्यांचा तपास हाती येताच पोलिसांनी डी. के रावसह इतर सहाजणांना गुरुवारी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी अटक केली. अटक आरोपींनी व्यावसायिकाची फसवणुक करुन त्यांच्या मालकीचे हॉटेल हडप करण्यासाठी बोगस भाडे करारनामा बनविले होते. ते सर्व दस्तावेज लवकरच पोलिसांकडून जप्त करण्यात येणार आहे. अबूबकर, अब्दुल्ला आणि फारुख यांनी व्यावसायिकाचे हॉटेल इम्रान आणि इतर साथीदारांना चालविण्यासाठी दिले होते. त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला होता का. या संपूर्ण प्रकरणात सेंटलमेंटसाठी डी. के रावने प्रत्यक्षात भाग घेतल्याचे तपासात उघडकीस आले. त्याच्या सांगण्यावरुन इतर आरोपींनी त्यांच्याकडे अडीच कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. डी. के रावने सहारा हॉटेलमध्ये सेटलमेंटसाठी एक बैठक बोलाविली होती. त्यात कोण कोण उपस्थित होते. हॉटेल हडप करण्यासाठी तसेच खंडणीची मागणी करण्याच्या उद्देशाने आरोपी वेळोवेळी भेटल्याचे तपासात उघडकस आले. त्यामुळे त्यांच्याकडील मोबाईलचे कॉल डिटेल्सची माहिती काढली जात आहे.

डी. के राव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न, खंडणीसाठी धमकी देणे तसेच इतर ४८ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो छोटा राजनचा एकेकाळचा अत्यंत जवळचा आणि विश्‍वासू सहकारी म्हणून परिचित होता. त्यामुळे त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा तपास करायचा आहे असे सांगून सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दुसरीकडे आरोपींच्या वतीने कमिनी यादव, आलोकसिंग, किरण जाधव, सुमित्रा भोसले आणि रणधीर काळे यांनी बाजू मांडली होती. त्यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीला विरोध दर्शविला होता. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने डी. के रावसह इतर सहाजणांना गुरुवार ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page