भरवेगात जाणार्या कारची टॅक्सीला धडक लागून भीषण अपघात
टॅक्सीचालकासह महिलेचा जागीच मृत्यू; कारचालकास अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 मार्च 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या कारची समोरुन येणार्या टॅक्सीला धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात टॅक्सीचालकासह प्रवाशी महिलेचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रेखा परमार ऊर्फ जमेरिया आणि शंकरअय्या नरसय्या गोळीवाडा यांचा समावेश आहे. या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला कॉलेज तरुण प्रियांशू अमर वांद्रे याला दादर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हा अपघात दुपारी दिड वाजता दादर येथील एलफिस्टन ब्रिजवरील इंटरनॅशनल सेंटरसमोर झाला. रेखा ही 55 वर्षांच महिला चिंचपोकळी येथील चमेलीवाडी परिसरात राहते. शनिवारी सकाळी ती गुढीपाडवा निमित्त दादरच्या फुल मार्केटमध्ये सामान खरेदीसाठी आली होती. सामान खरेदी करुन ती टॅक्सीने तिच्या घराच्या दिशेने जात होती. ही टॅक्सी एलफिस्टन ब्रिजवरुन जाताना समोरुन भरवेगात येणार्या एका कारने टॅक्सीला जोरात धडक दिली. या धडकेने टॅक्सीचे प्रचंड नुकसान झाले होते. टॅक्सीचालकासह प्रवाशी महिला रेखा ही गंभीरररीत्या जखमी झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी रवाना झाले होते. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे रेखाला मृत घोषित करण्यात आले तर उपचारादरम्यान टॅक्सीचालकाचा मृत्यू झाला. चौकशीदरम्यान त्याचे नाव शंकरअय्या गोळीवाडा असल्याचे उघडकीस आले. तो गोरेगावचा रहिवाशी असून सकाळची तो टॅक्सी घेऊन घरातून निघाला होता. या अपघातात कारचालक प्रियांशू हा 21 वर्षांचा तरुणही जखमी झाला होता. त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून दोन व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याच गुन्ह्यांत त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. प्रियांशू हा माटुंगा येथील टाटा पॉवर कॉलनीत राहत असून चेंबूरच्या एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षांत शिकतो. दुपारी तो लोअरपरेल येथून दादरमार्गे माटुंग्याला जात होता. यावेळी भरवेगात कार चालविण्याच्या प्रयत्नात त्याने समोरुन येणार्या टॅक्सीला जोरात धडक दिल्याचे उघडकीस आले आहे. त्याची मेडीकल करण्यात येणार असून त्याने कार चालविताना मद्यप्राशन केले होते का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.