अ‍ॅक्टिव्हा स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

खड्ड्यामुळे व्यक्तीला जीव गमवावा लागल्याचा अंदाज

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 एप्रिल 2025
मुंबई, – अ‍ॅक्टिव्हा स्लिप होऊन झालेल्या जिगर दिलीप गाला या 40 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी एल्फिस्टन ब्रिजवर घडली. खड्ड्यामुळे जिगरला जीव गमवावा लागल्याचे बोलले जाते. याप्रकरणी दादर पोलिसांनी एडीआरची नोंद केली असून पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी जिगरचे वडिल दिलीप गाला आणि चुलत भाऊ भाविन गाला याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे.

हा अपघात बुधवारी सकाळी सव्वासहा वाजता एल्फिस्टन ब्रिज, व्ही. एस रोड गेमन इंडियासमोरील भिकू इमारतीजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दिलीप गाला हे प्रभादेवी येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मृत जिगर हा त्यांचा मुलगा तर भाविन भावाचा मुलगा आहेत. बुधवारी सकाळी सहा वाजता ते दोघेही त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा बाईकवरुन प्रभादेवी येथून परळला कामासाठी जात होते. ही अ‍ॅक्टिव्हा भाविन चालवत होता तर जिगर त्याच्या मागे बसला होता. एल्फिस्टन ब्रिज, भिकू इमारतीजवळ जाताना खड्ड्यामुळे त्यांची स्लिप झाली आणि त्यात जिगरला गंभीर दुखापत झाली होती. डोक्याला मार लागल्याने त्याला भाविनने तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

उपचार सुरु असताना पावणेआठ ते आठच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जिगरचे वडिल दिलीप गाला आणि चुलत भाऊ भाविन गाला यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. जिगरच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page