मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जुलै 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका वाहनाच्या धडकेने 35 ते 40 वयोगटातील एका पादचार्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दादर परिसरात घडली. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन अपघातानंतर पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध सुरु केला आहे.
हा अपघात गुरुवारी पहाटे चार ते सकाळी पावणेसातच्या सुमारास दादर येथील सयानी रोड, एस. टी डेपोजवळील ठसका रेस्ट्रॉरंटसमोरील रस्त्यावर झाला. सदानंद नामदेव गुरव हे वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशी असून सध्या ते दादर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री ते त्यांच्या सहकार्यासोबत परिसरात गस्त घालत होते. सकाळी पावणेसात वाजता मध्य नियंत्रण कक्षातून पोलिसांना एस. टी डेपोजवळ एक अपघात झाला असून जखमी व्यक्तीला पोलीस मदतीची गरज आहे असा कॉल प्राप्त झाला. त्यामुळे पोलीस पथक तिथे रवाना झाले. घटनास्थळी पोलिसांना एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 असून त्याची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू त्याच्याकडे सापडली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीस भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात तो जखमी झाला होता, मात्र वाहनचालक त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच पोलीस हवालदार नामदेव गुरव यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाचा परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस शोध घेत आहेत.