टेम्पो अपघातात जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

दादर येथील अपघात; टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – टेम्पो अपघातात जखमी झालेल्या एका 80 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नलिनी नामदेव मयेकर असे या मृत महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूप्रकरणी आरोपी टेम्पोचालकाविरुद्ध दादर पोलिसांनी हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या टेम्पोचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

हा अपघात शुक्रवारी 6 फेब्रुवारीला दादर येथील गोपीनाथ चव्हाण चौक, सयानी रोडवर झाला. विकास नामदेव मयेकर हे 61 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार डोबिवलीतील चिंचोली पाडा, सुभाष रोडच्या सरस्वती अनंत सोसायटीमधश्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मृत वयोवृद्ध महिला नलिनी या त्यांची आई असून ती दादर येथील सयानी रोड, खेडगल्ली, नेहा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहते. ते त्यांच्या आईला अधूनमधून जाऊन भेटत होते.

6 फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजता त्यांना त्यांच्या आईचा अपघात झाल्याची माहिती समजली होती. त्यामुळे ते केईएम हॉस्पिटलमध्ये आले होते. तिथे त्यांना तिच्यावर उपचार सुरु असून तसेच तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजले होते. कामासाठी घराबाहेर पडलेल्या नलिनी यांना रस्ता क्रॉस करताना एका टेम्पोने धडक दिली होती. त्यात ती जखमी झाली होती. अपघातानंतर टेम्पोचालक तिला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. ही माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

तिला तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे पोलिसांकडून समजले होते. केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विकास मयेकर यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्यांच्या तक्रारीवरुन आरोपी टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. टेम्पोचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून या क्रमांकाचा आरोपी चालकाला लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page