सभेला परवानगी नाकारली म्हणून एअरगनने जिवे मारण्याची धमकी
सभासदाच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 सप्टेंबर 2025
मुंबई, – सभेला परवानगी नाकारली म्हणून विजय मारुती सापळे या सभासदाला एअरगनने जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार प्रभादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच विनोद भोसले या आरोपीस दादर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी एक एअरगन ताब्यात घेतली असून त्याच्याकडे गन बाळगण्याचा कुठलाही परवाना नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी त्याने स्वतजवळ एअरगन ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.
विजय सापळे हे प्रभादेवीतील रहिवाशी असून ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. वरळीतील एका खाजगी कंपनीत ते कामाला आहेत. रविवारी सायंकाळी चार वाजता वरळी येथील हिरो शितलदास पुनवाणी येथे त्यांच्या मरिअम्मा नगर एसआरए गृहनिर्माण सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. या सभेला त्यांच्यासह त्यांच्या परिचित विनोद भोसले हे उपस्थित होते. मात्र सभेला जे सभासद नाही, अशा लोकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. विनोद हा त्यांचा सभासद नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याला सभेला त्याला उपस्थित राहता येणार नाही असे सांगितले होते. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता.
रागाच्या भरात तो सभेतून निघून गेला होता. सायंकाळी साडेसात वाजता सभा संपताच विजय सापळे हे घरी जाण्यासाठी निघाले होते. ते त्यांच्या इमारतीजवळ आले असता तिथे विनोद भोसले आला. त्याने त्याच्याकडील एअरगनने जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेने ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी विनोद भोसलेला चौकशीसाठी ताबब्यात घेतले होते. त्यानंतर विजय सापळे यांनी दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून विनोद भोसलेविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्याकडून बंदूकीसारखी दिसणारी एअर अन पोलिसांनी जप्त केली आहे. त्याच्याकडे एअर गन बाळगण्याचा कुठलाही परवाना नसल्याचे उघडकीस आले. एअरगन ठेवून त्याने विजय सापळे यांना धमकावून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.