मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मित्रांसमोर उसने पैसे मागितले म्हणून राहुल लक्ष्मण कदम या २८ वर्षांच्या तरुणावर त्याच्याच मित्राने फरशीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री प्रभादेवी परिसरात घडली. या हल्ल्यात राहुल हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच दिपक दशरथ ताटे याला दादर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला भोईवाडा लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजता प्रभादेवी येथील धनमिल नाका एलफिस्टस्न ब्रिजकडे जाणार्या श्री दत्त बजरंग सोसायटीजवळ घडली. राहुल हा काळाचौकी परिसरात राहत असून मजुरीचे काम करतो. दिपक हा त्याचा मित्र असून काही दिवसांपूर्वी त्याने त्याला उसने पैसे दिले होते. पैशांची मागणी करुनही तो त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होता. रविवारी रात्री साडेअकरा वाजता राहुलने दिपककडे त्याच्या उसने पैशांची मागणी केली होती. यावेळी दिपक हा त्याच्या मित्रांसोबत होता. मित्रांसोबत उसने पैसे मागितले म्हणून त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून त्याने तिथे पडलेल्या फरशीने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात राहुलच्या डोक्याला, तोंडाला, गालाला आणि हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर तो तेथून पळून गेला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
रक्तबंबाळ झालेल्या राहुलला पोलिसांनी तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्या जबानीनंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी दिपक ताटे याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दिपकला काही तासांत प्रभादेवी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर सोमवारी दुपारी त्याला भोईवाडा येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.