चाळीच्या पुर्नविकासात गुंतवणुकीच्या नावाने फसवणुक
दादर येथील घटना; चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – पवईतील एका चाळीच्या पुर्नविकासात गुंतवणुक करण्याची ऑफर देत एका व्यावसायिकाची चारजणांच्या टोळीने सुमारे ३१ लाखांची फसवणुक केली. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश बडे, राजूअण्णा, पंकज गणेश बडे आणि विजय जाधव अशी या चौघांची नावे असून या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. यातील गणेश बडे याच्याविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे एका व्यक्तीची चौदा लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिवडी येथे राहणारे तक्रारार सूर्यकांत नामदेव खैरे हे व्यावसायिक आहेत. त्यांची गजानन इंटरप्रायझेज नावाची एक कंपनी असून ही कंपनी फुड प्रोडक्ट सप्लाय करण्याचे काम करते. विजय जाधव हा त्यांचा मित्र असून जानेवारी २०२२ साली तो त्यांच्या दादर येथील कार्यालयात आला होता. त्याच्याकडे पवईतील एका चाळीच्या पुर्नविकासाची योजना होती. याच संदर्भात जागेची पाहणी करण्यासाठी त्याने त्यांना पवईतील चाळीजवळ आणले होते. तिथे त्याने त्यांची ओळख गणेश बडे आणि पंकज बडे झाली होती. त्यांनी ही चाळ विकसित करायची असल्याचे सांगून त्यासाठी फायनान्सरची गरज आहे आहे. त्यामुळे त्यांच्या चाळीच्या पुर्नविकासाच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी गुंतवणुक करावी अशी विनंती केली होती. जागेची पाहणी केल्यानंतर तयांनी चाळीचा मालकाशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात जागेच्या पुर्नविकासात त्यांचा तीस टक्के तर उर्वरित सत्तर टक्के चाळीचा मालकासह गणेश बडे आणि विजय जाधव यांना देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे १ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत त्यांनी गणेश आणि पंकज बडे यांना ३१ लाखांची आर्थिक मदत केली होती. ही रक्कम दिल्यांनतर सहा महिन्यानंतर बांधकामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. याबाबत विचारणा केल्यानंतर गणेशने राजूअण्णा याच्याकडे सर्व परवानगीचे काम देण्यात आले असून त्यासाठी त्याला २५ लाख रुपये दिले आहेत. त्याला लवकरच बांधकामाची परवानगी मिळेल असे सांगितले.
मात्र काही महिने उलटूनही बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे त्यांनी राजूअण्णाशी संपर्क साधला असता त्याने त्याला फक्त पाच लाख रुपये देण्यात आले आहे. उर्वरित रक्कम न दिल्याने काही परवानगी मिळाल्या नाहीत. यावेळी त्याने त्यांना गणेशसोबत झालेल्या कराराची एक प्रत पाठवून दिली होती. याबाबत त्याने पुन्हा गणेशकडे विचारणा केली असता तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. याच दरम्यान त्यांना गणेशने अशाच प्रकारे अन्य एका व्यक्तीकडून चाळीच्या पुर्नविकासात गुंतवणुकीच्या नावाने चौदा लाख रुपये घेतले होते. मात्र चाळीचा पुर्नविकास न करता त्याने दिलेल्या पैशांचा अपहार केला होता. याबाबत त्याने दिलेल्या तक्रारीवरुन गणेश बडे याच्याविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधित आरोपीविरुद्ध भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गणेश बडे, राजूअण्णा, पंकज गणेश बडे आणि विजय जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.