मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ डिसेंबर २०२४
मुंबई, – बदलापूर येथील एका निर्माणधीन इमारतीमध्ये अकरा फ्लॅटधारकाच्या नावाने गृहकर्ज घेऊन मोतीलाल ओस्वाल होम फायनान्स कंपनीची सुमारे चार कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिद्धीटेक होम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दोन संचालकासह एक फ्लॅटमालक अशा तिघांविरुद्ध दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हेमंत मोहन अग्रवाल, रामप्रवेश रामचंद्र सिंग आणि नेहा अग्रवाल अशी या तिघांची नावे असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
अचल देवेंद्रनाथ पाठक हे विरार येथे राहत असून मोतीलाल ओस्वाल होम फायनान्स लिमिटेड या कंपनीत म्हणून कामाला आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते लिगल विभागात वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. ही कंपनीत गृहकर्ज देते. ज्या लोकांनी कंपनीकडून गृहकर्ज घेतले आहे, मात्र गृहकर्जाचे हप्ते भरले नाही अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करुन त्यांच्याकडून रिकव्हरी करण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्याकडे सध्या तीस प्रकरणाचा तपास होता. त्यापैकी सिद्धीटेक होम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एक प्रकरण होते. या कंपनीत हेमंत अग्रवाल, रामप्रवेश सिंग हे दोघेही संचालक म्हणून काम करतात. २०१५ साली या कंपनीने त्यांच्या बदलापूर येथील कर्जत रोड, कारव्ही गाव, सिद्धी सिटी फेज पाच या निर्माणधीन इमारतीसाठी कंपनीकडून १ कोटी ५९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावेळेस हा प्रोजेट अंडर कन्स्ट्रक्शन होता.
कंपनीने अकरा फ्लॅटचे त्यांच्या कंपनीसोबत ट्रायपार्टी करार केला होता. हा करार कंपनीचे ग्राहक, सिद्धीटेक आणि मोतीलाल ओस्वाल यांच्यात झाला होता. त्यात इमारतीचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यास फ्लॅटचा ताबा संबंधित अकरा फ्लॅटधारकांना देऊन त्याच्या मूळ विक्री करारनामा कागदपत्रांसह मोतीलाल ओस्वाल कंपनी त्यांच्या कंपनीला सादर करणार असे नमूद करण्यात आले होते. यावेळी अकरा फ्लॅटधारकांनी दोन गृहकर्जाचे हप्ते भरले होते, मात्र नंतर त्यांनी हप्ते भरणे बंद केले होते. त्यामुळे त्यांनी साईटला भेट घेतली असता सप्टेंबर २०२४ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसून आले. त्यापैकी एका फ्लॅटची कंपनीने परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री केली होती. या फ्लॅटमध्ये संबंधित व्यक्ती त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता.
दुसरीकडे दहा फ्लॅटचा सिद्धीटेक होम कंपनीने संबंधित फ्लॅटधारकांना ताबा दिलाच नव्हता. या अकरा फ्लॅटवर गृहकर्ज असताना त्यांनी एका फ्लॅटची विक्री करुन उर्वरित फ्लॅटचा ताबा न देता कंपनीची सुमारे चार कोटीची फसवणुक केली होती. अशा प्रकारे सिद्धीटेक होम कंपनीने त्यांच्या कंपनीसोबत केलेल्या कराराचा भंग केला होता. कंपनीने बोगस ग्राहकाची माहिती सादर करुन त्यांच्या नावाने गृहकर्ज घेऊन ही फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने अचल पाठक यांनी दादर पोलीस ठाण्यात सिद्धीटेक होम कंपनीचे दोन्ही संचालक हेमंत अग्रवाल, रामप्रवेश सिंग आणि फ्लॅटधारक महिला नेहा अग्रवाल अशा तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.