मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – कोट्यवधी रुपयांचे टोरेस प्रकरण ताजे असताना ४५ दिवसांत दुप्पट रक्कमेच्या आमिषाने बेस्टमधून प्रशासकीय अधिकारी म्हणून झालेल्या एका ५८ वर्षांच्या व्यक्तीसह त्यांच्या परिचित लोकांची फसवणुक झाल्याचा अन्य एक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीचा मालक सुनिल गुप्ता याच्याविरुद्ध दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुक झालेले तक्रारदार पोलीस ठाण्यात येत असल्याने फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
५८ वर्षांचे राजीव शरद दोंदे हे माहीम परिसरात राहत असून ते डिसेंबर २०२४ रोजी बेस्टमधून प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत त्यांच्या एका मित्राने त्यांना सुनिल गुप्ताविषयी माहिती दिली होती. सुनिलची पॉकेट फे्रंडली इन्वेस्टमेंट ऍण्ड फायनान्स कंन्सलटन्सी नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना ३० दिवसांत गुंतवणुक केलेली रक्कम दुप्पट मिळते असे सांगितले होते. त्यामुळे ते त्याच्यासोबत सुनिल गुप्ताला भेटण्यासाठी त्याच्या प्रभादेवी येथील कार्यालयात गेले होते. तिथे त्यांना काही लोक त्याच्याकडे दुप्पट रक्कमेच्या आमिषाला बळी पडून गुंतवणुकीसाठी आल्याचे दिसून आले.
या गुंतवणुकीनंतर तो त्यांना एक पावती देत होता. त्यात गुंतवणुकदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक,, गुंतवणुक केलेल्या रक्कमेची तारीख असा मजकूर होता. तिथे असलेली गर्दी पाहिल्यानंतर त्यांना सुनिलवर विश्वास निर्माण झाला होता. त्याची भेट घेतल्यानंतर त्याने त्याच्या गुंतवणुक योजनेची माहिती देताना त्यांना ३० दिवसांऐवजी आता ४५ दिवसांत दामदुप्पट योजनेची माहिती दिली. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडे दिड लाखांसह दोन्ही मुलींच्या नावाने दहा आणि वीस हजाराची गुंतवणुक केली होती. यावेळी त्यांना त्यांच्या काही परिचितांनीही तिथे गुंतवणुक केल्याची माहिती समजली होती. मात्र ४५ दिवसांनी सुनिलला कोणालाही दुप्पट रक्कम दिली नाही. तो त्याचे कार्यालय बंद करुन पळून गेल्याचे अनेकांच्या लक्षात आले होते.
अशा प्रकारे सुनिलने त्यांच्यासह त्यांच्या परिचित लोाकंकडून आठ लाख ऐंशी हजार रुपये घेतले आणि कोणालाही दुप्पट रक्कम दिले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच या सर्वांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सुनिलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात ही रक्कम आठ लाख ऐंशी लाख रुपये असली तरी फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुनिलकडे अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणुक केली असून ही रक्कम घेऊन तो पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.