व्यवसायासाठी क्रेडिटवर घेतलेल्या साडेसतरा लाखांचा अपहार
दादरच्या व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 नोव्हेंबर 2025
मुंबई, – व्यवसायासाठी क्रेडिटवर घेतलेल्या साडेसतरा लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्धाची त्यांच्याच परिचित व्यावसायिकाने फसवणुक केल्याची घटना दादर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमन मिलन शाह या व्यावसायिकाविरुद्ध दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमनने दहा टक्के व्याजदाराचे आमिष दाखवून ही फसवणुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
60 वर्षांचे तक्रारदार सदानंद सखाराम पवार हे व्यावसायिक असून दादर येथे रज्ञाहतात. त्यांचा इंटेरियल डेकोरेटर्सचा व्यवसाय आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांची अमन शाहशी ओळख झाली होती. त्याची रुद्र इंटरप्रायजेस नावाची एक कंपनी आहे. या ओळखीदरम्यान अमनने त्याच्यासह त्याचे वडिल मिलन गुणवंत शाह हे महानगरपालिकेचे मोठे कॉन्ट्रक्टर असल्याचे भासविले होते. आतापर्यंत अनेक मोठी सुशोभिकरणाचे काम मिळाले आहेत, त्यांच्या वडिलांचा मंडप डेकोरेटर्सचा मोठा व्यवसाय आहे. याच दरम्यान सदानंद पवार हे अमनच्या घरी गेले होते. यावेळी त्याने त्यांची त्यांच्या आई-वडिलांशी ओळख करुन दिली होती.
नोव्हेंबर 2021 रोजी अमनने सदानंद यांची पत्नी वर्षा यांना फोन करुन त्याला आर्थिक अडचण असल्याचे तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले होते. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या कंपनीला मनपाकडून तीन वर्षांपासून वेगवेगळ्या कामाचे तीन कोटीचा निधी मिळाला नसल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांनीही त्यांची फसवणुक केली आहे. पाच वर्षांत काम करुन त्यांनी त्यांना कुठलाही मोबदला दिला नाही. त्यांना मनपाचे कांदिवली येथे सुशोभिकरणाचे काम मिळाले आहे. त्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे 40 लाखांची मदतीची विनंती केली होती.
या कामातून त्यांना तीस लाख रुपये फायदा होणार असून तो त्यांना दहा टक्के कमिशन देईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी त्यांचे एफडी तोडून जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत त्याच्यावर विश्वास ठेवून 37 लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्याने त्यांना दहा कोरे धनादेश दिले होते. या पैशांच्या मोबदल्यात त्याने त्यांना त्यांना 40 लाख 90 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
ठरल्याप्रमाणे त्याने त्यांना जून 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत 19 लाख 50 हार रुपये दिले. मात्र उर्वरित साडेसतरा लाख रुपये दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना खोटी आश्वासने देत होता. दोन वर्षांत त्याने मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम दिली नाही. विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
अमनकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच सदानंद पवार यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमन शाह याच्याविरुद्ध पोलिसांनी पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे.