59 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

कंपनीच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने गंडा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2026
मुंबई, – सुमारे 59 लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका पती-पत्नीविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नम्रता चंदीरमाणी आणि पंकज मसंद अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेसह तिच्या वयोवृद्ध आईची फसवणुक केल्याचा आरोप आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी दादर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

42 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या आई आणि दोन मुलीसोबत प्रभादेवी येथे राहते. जानेवारी 2024 रोजी तिची नम्रता चंदीरमाणीशी ओळख झाली होती. तिने तिचा पती पंकज मसंदसोबत त्यांच्याच शेजारी एक गाळा भाड्याने घेतला होता. याच गाळ्यातील त्यांचा ऑनलाईन व्यवसाय चालत होता. काही दिवसांत तिची नम्रतासोबत चांगली मैत्री झाली होती. अनेकदा नम्रताचे दोन्ही मुले तिच्या घरी खेळण्यासाठी येत होते. मे 2024 रोजी ते सर्वजण लोणावळा येथे फिरायला गेले होते. यादरम्यान तिने तिच्या पतीसोबत तीन खाजगी कंपन्या आहेत. या कंपनीत तिने गुंतवणुक केल्यास तिला चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते.

मात्र तिने तिला प्रतिसाद दिला नव्हता. काही दिवसांनी नम्रता आणि तिचा पती पंकज हे दोघेही तिच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी तिच्यासह तिच्या आईला पुन्हा कंपनीविषयी माहिती सांगून त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांना कंपनीत पार्टनरशीपची ऑफरही दिली होती. या पैशांचा भविष्यात चांगला फायदा होईल असे सांगून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने त्यांच्या कंपनीत गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता.

ठरल्याप्रमाणे मे 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत तिच्यासह तिच्या आईने नम्रता आणि पंकज यांच्या कंपनीत 12 लाख 59 हजार 590 रुपये कॅश स्वरुपात, 44 लाख रुपयांचे विविध सोन्याचे, अडीच लाख रुपयांचे चांदीचे दागिने असे सुमारे 59 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र गुंतवणुकीवर त्यांनी तिला कुठलाही परतावा दिला नाही. काही दिवसांनी ते दोघेही प्रभादेवी येथील गाळा बंद करुन निघून गेले होते. ते कुलाबा येथे राहत होते, तिथे जाऊन चौकशी केल्यानंतर ते दोघेही त्यांच्या कुलाबा येथील राहत्या घरी राहत नव्हते. फसवणुकीनंतर ते दोघेही पळून गेले होते. त्यांचे मोबाईल बंद होते.

हा प्रकार उघडकीस येताच या महिलेने त्यांची दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नम्रता आणि पंकज या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पती-पत्नीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page