पाच वर्षांत 50 टक्के परताव्याच्या आमिषाने दहा कोटीची फसवणुक
दिडशेहून अधिक गुंतवणुकदारांना गंडा; आकडा वाढण्याची शक्यता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मार्च 2026
मुंबई, – पाच वर्षांत हमखास आकर्षक 50 टक्के परतावा देण्याचा दावा करुन दादरच्या खाजगी कंपनीने 150 हून अधिक गुंतवणुकदारांची सुमारे दहा कोटीची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सचिन फडतरे आणि निखिल शेलार यांच्यविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही निओग्रीन वेंचर प्रायव्हेट लिमिटेड, निओग्रीन अग्रीकल्चर, निओग्रीन होम्स प्रायव्हेट लिमिटेडसह इतर कंपनीचे मालक आणि संचालक आहे. आतापर्यंत कंपनीने 150 हून गुंतवणुकदारांची दहा कोटीची फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले असले तरी ही रक्कम त्यापेक्षा अधिक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
आरती कौस्तुभ ठाकरे ही महिला सायन परिसरात राहत असून कांदिवलीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. डिसेंबर 2022 रोजी तिच्या पतीचा मित्र राहुल जोशीने त्यांना तो निओग्रीन वेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कामाला असल्याचे सांगून कंपनीचे विविध गुंतवणुक योजना आहे. त्यापैकी एका योजनेत पाच लाखांची गुंतवणुक केल्यास पाच वर्षांत त्यांना साडेबारा लाख रुपये मिळतील असे सांगितले होते. या माहितीनंतर आरती ही तिच्या पतीसोबत कंपनीच्या दादर येथील एन. सी केळकर रोड, शिवसेना भवनजवळील कोहीनूर स्क्वेअर, बी विंगच्या 401 मध्ये गेली होती. तिथेच त्यांची सचिन फडतरे आणि निखिल शेलारशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांना ही कंपनीत मोरिंगा पावडरचे प्रोडेक्शन करत असून हा माल विदेशात निर्यात केला जातो. त्यातून ते त्यांच्या कंपनीच्या गुंतवणुकदारांना पाच वर्षांत त्यांच्या गुंतवणुकीवर 50 टक्के वार्षिक परतावा देत असल्याचा दावा केला होता.
त्यांच्यावर विश्वास ठेवून आरतीने पाच लाख, तिचे पती कौस्तुभने एक लाख तर तिची आई दिपाली सापळे हिने दोन लाखांची कॅश स्वरुपात गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर तिला दरमाह 20 हजार 833 तर तिच्या आईला 8 हजार 333 रुपये मिळणार होते. डिसेंबर 2022 रोजी त्यांचा कंपनीशी करार झाला होता. जानेवारी ते जुलै 2023 दरम्यान कंपनीला तिला 1 लाख 45 हजार 831 रुपये दिले. मात्र नंतर त्यांनी दरमाह व्याजाची रक्कम देणे बंद केले. त्यामुळे तिने सचिनला संपर्क साधून विचारणा केली होती, यावेळी त्याने कंपनीला प्रचंड नुकसान झाल्याचे सांगून पैसे देण्यास कंपनीत असमर्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीने त्यांना काही धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते.
नोव्हेबर 2025 रोजी सोशल मिडीयावर ही कंपनी फ्राँड असल्याचा रिव्हीव्ह आला होता. त्यामुळे अनेकांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन त्यांच्या गुंतवणुक रक्कमेची मागणी सुरु केली होती. यावेळी कंपनीने तीन महिन्यांत मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासन देताना तिच्या बँक खात्यात 14 हजार रुपये ट्रान्स्फर केले. मात्र नंतर कंपनीकडून त्यांना मूळ रक्कम परत करण्यात आली नाही. तपासात निओजन निधी, निओग्रीन होम्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच इतर कंपन्यांमध्ये जवळपास 150 हून अधिक गुंतवणुकदारांनी सुमारे दहा कोटीची रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र कंपनीने कोणालाही मूळ रक्कमेसह परतावा दिला नाही. हा प्रकार निदर्शनास येताच आरती ठाकरे यांच्यासह इतर गुुंतवणुकदारांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
याबाबत त्यांनी पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार करुन कंपनीच्या मालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सचिन फडतरे आणि निखील शेलार यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कंपनीकडून फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी शिवाजी पार्क पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.