दादर येथे डॉक्टरच्या घरातून आठ लाखांच्या दागिन्यांची चोरी
उघड्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्याची हातसफाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – दादर येथे एका नामांकित डॉक्टरच्या घरातून सुमारे आठ लाखाचे विविध सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. उघड्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन हातसफाई केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.
ही घटना 2 एप्रिल ते 15 एप्रिल 2025 या कालावधीत दादरच्या पद्माबाई ठक्कर मार्ग, ओम हाईट्स अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 502 मध्ये 54 वर्षाचे तक्रारदार समीर शांताराम शिंदे हे त्यांची पत्नी, मुलगा आणि वयोवृद्ध आईसोबत राहतात. त्यांच्यासह त्यांची पत्नी नंदीनी हे दोघेही डॉक्टर आहेत. दादर परिसरात त्यांचे शिंदे चिल्ड्रेन नावाचे एक खाजगी क्लिनिक असून तिथे ते दोघेही काम करतात. काही वेळेस ते दोघेही जोगेश्वरीतील एका हॉस्पिटलमध्ये व्हिजीट देतात. त्यांचा 22 वर्षांचा मुलगा ईशान हा वैद्यकीय शिक्षणासाठी सध्या अमेरिकेत राहतो तर त्यांची आई जयश्री ही गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या गावी वास्तव्यास आहे. त्यांच्या घरी स्वयंपाक आणि सफाईसाठी दोन महिला कामाला आहेत.
शनिवारी 12 एप्रिलला त्यांच्या घरी एसी सर्व्हिससाठी एक व्यक्ती आला होता. जवळपास दोन ते तीस तास काम करुन तो निघून गेला. त्यानंतर त्यांच्यासह त्यांची पत्नी त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यांच्या पत्नीला 26 वर्षांपूर्वी स्त्रीधन म्हणून काही दागिने मिळाले होते, ते सर्व दागिने त्यांनी त्यांच्या बेडरुमच्या कपाटात ठेवले होते. दहा दिवसांनी तिने ते दागिने पाहिले होते. मंगळवार 15 एप्रिलला त्यांच्या नातेवाईकाचे लग्न होते, त्यामुळे त्यांच्या पत्नीने कपाटातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिला कपाटात कुठेच दागिने सापडले नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर तिला आठ लाख सोळा हजाराचे लाखांचे विविध सोन्याचे दागिने दिसून आले नाही.
घरात प्रवेश करुन अज्ञात व्यक्तीने कपाटातील सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी शिवाजी पार्क पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. इमारतीसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु आहे. घरातील मोलकरणीसह एसी रिपेरिंगसाठी आलेल्या कर्मचार्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीतून काही गोष्टींचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.