दारुच्या नशेत महिला पत्रकाराला अश्लील स्पर्श करुन विनयभंग
दादर रेल्वेतील ब्रिजवरील घटना; दोन तासांत आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जुलै २०२४
मुंबई, – दारुच्या नशेत एका महिला पत्रकाराला अश्लील स्पर्श करुन विनयभंग झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी दादर रेल्वे स्थानकातील ब्रिजवर घडला. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासांत आरोपी रामबहादूर थापा याला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. रामबहादूर हा नेपाळचा रहिवाशी असून गुन्ह्यांच्या वेळेस त्याने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.
चिंचपोकळी येथे राहणारी तक्रारदार महिला पत्रकार आहे. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ती दादर रेल्वे स्थानकावरील ब्रिजवरुन जात होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकारानंतर तो तरुण तेथून पळून गेला होता. घडलेल्या प्रकारानंतर ती दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गेली होती. तिथे उपस्थित पोलिसांना ही माहिती सांगून तिने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अवघ्या दोन तासांत रामबहादूर थापा या संशयिताला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्याकडून दारुच्या नशेत हा गुन्हा घडल्याचे उघडकीस आले. मूळचा नेपाळचा रहिवाशी रामबहादूर हा काहीच कामधंदा करत नाही. त्याला दारु पिण्याचे व्यसन असल्याचे उघडकीस आले आहे.