दादरच्या किर्ती कॉलेजवळील समुद्रात तरुणाचा मृतदेह सापडला
हत्या करुन मृतदेह समुद्रात फेंकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – दादरच्या किर्ती कॉलेजवळील समुद्राजवळ एका ३५ वयोगटातील अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला. शवविच्छेदनानंतर या तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. हत्येनंतर मृतदेह समुद्रात फेंकून मारेकर्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दादर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत. दरम्यान मृतदेहाची ओळख पटली नसून त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्याचे बोलले जाते.
गुरुवारी १८ एप्रिलला दुपारी पावणेचार वाजता दादर येथील किर्ती कॉलेज चौपाटीजवळील समुद्रकिनारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती दादर पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. शरीरात पाणी गेल्याने बॉडी पूर्ण फुगली होती. त्याचे डोळे आणि जीभ बाहेर आले होते. मृतदेह ताब्यात घेतत्यानंतर शवविच्छेदनासाठी शीव रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शुक्रवारी पोलिसांना प्राप्त झाला. त्यात त्याच्या डोक्याला जड वस्तूने मारहाण केल्याचे दिसून आले. त्याच्या कमरेला, पोटाला, मनगटाला आणि हाताला जखमा दिसून आले. ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू त्याच्याकडे सापडली नव्हती. त्याच्या डाव्या हातावर ज्योती तर उजव्या हातावर रंजना असे गोंदलेले होते. याच नावावरुन मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु आहे. त्याचे अंदाजे वय ३५ होते.
प्राथमिक तपासात त्याची हत्या करुन नंतर त्याचा मृतदेह समुद्रात फेंकून मारेकर्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश विठ्ठल निकम यांच्या तक्रारीवरुन दादर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचे काही अवयव रासायिक विश्लेषणासाठी सांताक्रुजच्या कालिना वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. मृतदेहाची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु आहे तर पळून गेलेल्या मारेकर्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. अनैतिक संबंध, आर्थिक वाद किंवा पूर्ववैमस्नातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.