मेहुण्याच्या घरी तोतया पोलिसाला पाठवून भावोजीकडून लुटमार
प्रभादेवीतील २० लाखांच्या लूटप्रकरणी चौघांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ ऑगस्ट २०२४
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी प्रभादेवी येथे झालेल्या वीस लाखांच्या लुटमारीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात दादर पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत चार आरोपींना पनवेल येथून पोलिसांनी अटक केली असून या चौघांकडून पोलिसांनी दहा लाखांची कॅश हस्तगत केली आहे. दान बहादूर जोरा, लालूसिंग रहेकाल, प्रताप रतन सिंग आणि दानसिंग देबीसिंग कामी अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर या चौघांनाही भोईवाडा येथील लोकल कोर्टाने शुक्रवार ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीद आहे. यातील दान तोरा हा तक्रारदाराचा भावोजी असून त्यानेच त्याचा मित्र दानसिंग कामी याला तोतया गुन्हे शाखेचा अधिकारी बनवून लुटमार करण्यास प्रवृत्त केल्याची धक्कदायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. प्रत्येकी पाच लाखांची वाटणी केल्यानंतर ते चौघेही पळून गेले होते, मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत मुख्य आरोपीसह चौघांनाही अटक करुन पोलिसांनी या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला.
ही घटना रविवारी पहाटे पावणेचार ते पावणेपाचच्या सुमारास प्रभादेवी येथील हातिस्कर मार्ग, सत्यविजय सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या रुम क्रमांक दोनमध्ये करण पदम बालाया (२८) हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. रविवारी पहाटे पावणेचार वाजता त्याचा घरी एक अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. त्याने तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याची बतावणी करुन घरातील सर्व लाईट चालू करण्यास सांगितले. त्याच्याकडे वॉरंट असून त्याला घराची झडती घ्यायची आहे. ही पोलीस कारवाई असल्याने त्यात कोणीही हस्तक्षेप करु नका, नाहीतर त्यांच्यावर कारवाई करु अशी धमकी दिली. सर्व सामानाची तपासणी केल्यानंतर त्याला त्याचे मालक राजन शंकर जाधव यांच्या मालकीचे वीस लाख रुपये मिळाले. ही कॅश ताब्यात घेऊन तो घरातून निघून गेला. हा प्रकार संशयास्पद वाटताच करण बालाया हा त्याच्या मागे जाऊ लागला. यावेळी त्याने त्याला शिवीागळ करुन मारहाण करण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तेथून पळून गेला. हा प्रकार संशयास्द वाटताच त्याने ही माहिती राजन जाधव यांच्यासह दादर पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घडलेला प्रकार पोलिसांना सांगून त्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध २०४, ३१८ (४), ३१९ (२), ३३२, ३५१ (२), ३५२ भादवी न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या पथकाने सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत दान जोरा हा या कटातील मुख्य आरोपी असल्याचे उघडकीस आले. तक्रारदार करण बलायाचा तो भावोजी असून त्याच्याच घरी ही कॅश ठेवण्यात आली होती. ही माहिती त्याला माहिती होती. त्यामुळे त्याने त्याच्या घरी तोतया गुन्हे शाखेचा अधिकारी म्हणून दानसिंग कामी याला पाठविले होते. ठरल्याप्रमाणे दानसिंग हा गुन्हे शाखेचा अधिकारी बनून करण बलायाच्या घरी गेला, त्याने झडतीच्या बहाण्याने वीस लाखांची घेतली. त्यानंतर तो पनवेल येथे गेला. तिथे त्याला इतर तिन्ही आरोपी भेटले. या चौघांनी प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन पैशांची वाटणी केली होती. तपासात परिचित व्यक्तीने ही लुटमार केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे करणसह त्याच्या घरातील प्रत्येक सभासदांची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. या चौकशीत दान जोरा याचे बिंग फुटले. त्यानेच ही लुटमार घडवून आणल्याची कबुली देताना त्याच्या इतर तीन सहकार्यांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानंतर या तिघांनाही पनवेल येथून पोलिसांनी अटक केली. या चारही आरोपींकडून पोलिसांनी दहा लाखांची कॅश हस्तगत केली असून उर्वरित दहा लाखांची कॅश लवकरच हस्तगत केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. यातील लालूसिंग आणि दानसिंग हे दोघेही सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. लालूसिंग हा घाटकोपरच्या साईनाथ मंदिर, जय संतोषी माता नगर तर दानसिंग हा पनवेलच्या मच्छी मार्केट, तिरुमती इमारतीमध्ये राहतो. प्रताप सिंग हा काहीच कामधंदा करत नसून नवी मुंबईच्या जुने पनवेल, लोखंडीपाड्यचा रहिवाशी आहे. अटकेनंतर या चौघांनाही मंगळवारी दुपारी भोईवाडा येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांच्याविरुद्ध इतर काही गुन्हे दाखल आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.