भांडणात मध्यस्थी करणार्‍या पोलीस पथकाला मारहाण

एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ डिसेंबर २०२४
मुंबई, – भांडणात मध्यस्थी करणार्‍या पोलीस पथकाला मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंद भाऊ पावसकर, प्रविण भाऊ पावसकर, पुष्कराज भाऊ पावसकर आणि सोनाली प्रविण पावसकर अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण उपेंद्रनगरचे रहिवाशी आहेत. याच गुन्ह्यांत चारही आरोपींना ३५ (३) बीएनएसएस २०२३ अन्वये नोटीस देण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता दादर येथील सेनापती बापट मार्गावरील उपेंद्रनगरात घडली.

अश्‍विनी प्रशांत देशमुख या महिला पोलीस शिपाई असून त्या सध्या मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, साईसदन अपार्टमेंटमध्ये राहतात. सध्या त्या दादर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारी उपेंद्रनगर परिसरात दोन गटात भांडण सुरु असून पोलीस मदत हवी आहे असा कॉल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला होता. ही माहिती प्राप्त होताच दादर पोलिसांचे एक विशेष पथक तिथे रवाना झाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. यावेळी सहाय्यक फौजदार साळुंखे, पोलीस शिपाई अश्‍विनी देशमुख यांना अरविंद आणि प्रविण यांनी धक्काबुक्की केली. त्यात साळुंखे हे खाली पडले. त्यांना इतर सहकार्‍यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला असता पुष्कराज आणि सोनाली यांनी त्यांना हाताने मारहाण सुरु केली होती. अशा प्रकारे या चौघांनी भांडण मिटविण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीस पथकाशी हुज्जत घालून मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही माहिती मिळताच दादर पोलीस ठाण्यात इतर अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांना मारहाण करणार्‍या महिलेसह चौघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. याप्रकरणी अश्‍विनी देशमुख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पावसकर कुटुंबियांविरुद्घ तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी पोलिसांशी हुज्जत घालून मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना नोटीस देण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page