दादर येथे ४० वर्षांच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी आरोपीस अटक
क्षुल्लक वादातून दगडाने ठेचून हत्या करुन पळाला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ डिसेंबर २०२४
मुंबई, – दादर येथे एका ४० वर्षांच्या व्यक्तीची दगडाने ठेचून झालेल्या हत्येचा पर्दाफाश करण्यात शिवाजी पार्क पोलिसांना यश आले आहे. मृत व्यक्तीचे नाव चंदन असून त्याच्या हत्येप्रकरणी मनोज अमीत सहारे या ३० वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. क्षुल्लक वादातून त्याने चंदन याची दगडाने ठेचून हत्या करुन घटनास्थळाहून पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना २६ डिसेंबरला रात्री बारा ते २७ डिसेंबर सकाळी साडेअकरा वाजण्यच्या सुमारास दादर येथील शिवाजीपार्क, रुक्मिणी सदन इमारतीसमोरील फुटपाथवर घडली. शुक्रवारी शिवाजी पार्क पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी रुक्मिणी सदन इमारतीसमोरील फुटपाथवर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या व्यक्तीला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे नाव चंदन असल्याचे उघडकीस आले होते. त्याची अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केली होती. हा प्रकार उघडकीस येताच शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजवरुन चंदनसोबत मन्या सहारे हा व्यक्ती दिसून आला होता. त्यानंतर त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला असता मन्याला दादर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच चंदनची हत्या केल्याची कबुली दिली. गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून त्याने त्याची दगडाने ठेचून हत्या केली होती. हत्येनंतर तो पळून गेला होता. मात्र हत्येचा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी दादर येथून अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मनोज हा शिवाजी पार्क मैदानाजवळील फुटपाथवर राहत असून भंगार वेचण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.