गहाळ झालेल्या मोबाईलवरुन साडेसहा लाखांचा ऑनलाईन व्यवहार
अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मे 2025
मुंबई, – दादर मार्केटमध्ये भाजी आणताना गहाळ झालेल्या मोबाईलवरुन ऑनलाईन व्यवहार करुन एका वयोवृद्धाच्या दोन बँक खात्यातून साडेसहा लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रफि अहमद किडवाई पोलिसांनी मोबाईल चोरीसह फसवणुक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास शिवाजी पार्क पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
विजय लक्ष्मण म्हात्रे हे 63 वर्षाचे वयोवृद्ध शिवडी परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत निवृत्त झाले आहेत. त्यांचे मुंबईसह अलीबाग येथील दोन विविध बँकेत बचत खाते असून यातील एका बँक खात्यात त्यांचे पेन्शन जमा होते. 1 मेला सकाळी साडेसहा वाजता ते भाजी खरेदीसाठी दादर भाजीमार्केटमध्ये आले होते. भाजी घेऊन ते साडेसात वाजता आले. यावेळी त्यांना त्यांचा मोबाईल गहाळ झाल्याचे समजले. भाजी घेताना त्यांचा मोबाईल कुठेतरी पडला होता. हा प्रकार पत्नीसह मुलाला सांगून ते त्यांच्या मामीच्या अत्यंविधीसाठी रायगडच्या अलीबागला निघून गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे ते त्यांच्या अलीबाग येथील बँकेत गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या बँक खात्यात 276 रुपये शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या खात्याचे स्टेटमेंट मागितले होते. यावेळी त्यांच्या बँक खात्यातून 1 मे ते 5 मे या कालावधीत युपीआयद्वारे 1 लाख 48 हजार 999 रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसून आले. अशाच प्रकारे त्यांच्या दुसर्या बँक खात्यातून 2 मे ते 7 मे या कालावधीत 4 लाख 93 हजार 508 रुपयांचे ऑनलाईन व्यवहार झाले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गहाळ झालेल्या मोबाईलवरुन 6 लाख 42 हजार 846 रुपयांचे ऑनलाईन व्यवहार करुन त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अलीबाग येथून मुंबईत येताच रफि अहमद किडवाई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध मोबाईल चोरीसह फसवणुक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसाकडून तपास सुरु आहे. त्यांच्या बँक खात्यात कुठे-कुठे ऑनलाईन व्यवहार झाले आहेत याची माहिती काढण्याचे काम आहे. तसेच मोबाईलचे सीडीआर काढले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सीडीआरवरुन अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.