मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2025
मुंबई, – अश्लील कृत्य करुन एका 23 वर्षांच्या तरुणीचा कुर्ला ते सायन रेल्वे स्थानकादरम्यान चालत्या लोकलमध्ये विनयभंग करुन पळून गेलेल्या आरोपीला सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने बारा दिवसांनी अटक करण्यात दादर रेल्वे पोलिसांना यश आले आहे. राहुल किसन जगधने असे या आरोपीचे नाव असून त्यानेच तक्रारदार महिलेचा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे. गुन्हा घडल्यानंतर तो स्वतचे अस्तिस्व लपविण्यासाठी तसेच पोलिसांची दिशाभूल करण्याचा सतत प्रयत्न करत होता, मात्र त्याचा प्रयत्न फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दुजोरा दिला आहे.
23 वर्षांची तक्रारदार तरुणी ही 20 फेब्रुवारीला रात्री सव्वादहा वाजता कुर्ला ते सायन असा लोकलने प्रवास करत होती. यावेळी महिलांच्या डब्ब्याजवळच्या अपंगच्या डब्ब्यातून प्रवास करणार्या एका तरुणाने तिच्याकडे पाहून अश्लील नजरेने पाहून तिच्याशी अश्लील कृत्य करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तो चालत्या लोकलमधून उडी घेऊन पळून गेला होता. घडलेला प्रकार तिने दादर रेल्वे पोलिसांना सांगून अज्ञात तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. रात्री घडलेल्या या घटनेची पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाट यांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांना दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम, पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गोडसे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कांबळे, रमेश सूर्यवंशी, महिला पोलीस हवालदार अभंग, सूर्यवंशी, पोलीस हवालदार आव्हाड, जगदाळे, जाधव, नवगिरी, मोहिते, पोलीस शिपाई राठोड, गांधले, निकाळे, चव्हाण यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. यावेळी रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये संशयित आरोपीची ओळख पटली होती. तो मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून नियमित प्रवास करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना घाटकोपर रेल्वे स्थानकात तो तरुण अपंगच्या डब्ब्यातून प्रवास करत असल्याचे महिला पोलीस पथकाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर या महिला अंमलदारांनी तिथे उपस्थित पोलिसांच्या मदतीने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दादर रेल्वे पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यात त्यानेच तक्रारदार महिलेचा विनयभंग केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. सीसीटिव्ही फुटेजवरुन सलग दहा ते बारा दिवस आरोपीचा शोध घेऊन त्याला घाटकोपर रेल्वे स्थानकातून शिताफीने अटक करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम व त्यांच्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.