मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मार्च 2025
मुंबई, – दारुच्या नशेत एका महिलेचा तरुणाने अश्लील स्पर्श करुन विनयभंग केल्याची घटना दादर रेल्वे स्थानकात उघडकीस आली. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आरोपी तरुणाला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. हमीदउल्ला मुक्तार शेख असे या 29 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा झारखंडचा रहिवाशी असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने महिला प्रवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
तक्रारदार महिला ही गृहिणी असून बुधवारी सायंकाळी ती दादर रेल्वे स्थानकात कामानिमित्त आली होती. फलाट क्रमांक आठवर ही लोकलची वाट पाहत होती. यावेळी प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन तिथे आलेल्या आरोपीने दारुच्या नशेत तिच्या पार्श्वभागावर नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेने तिने त्याला जाब विचारुन मारहाण केली होती. यावेळी तिथे उपस्थित प्रवाशांनीही त्याला चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन रेल्वे पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान त्याचे नाव हमीदउल्ला शेख असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा झारखंडचा रहिवाशी असून सध्या कुर्ला येथे राहतो. अटकेनंतर त्याला गुरुवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिलेसह प्रवाशांच्या मारहाणीत त्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.