मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – माटुंगा येथे कॉलेजला जाणार्या एका १९ वर्षांच्या तरुणीचे दादर ब्रिजवर अज्ञात माथेफिरु तरुणाने केस कापल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी या तरुणाविरुद्ध मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. दादर रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
१९ वर्षांची तक्रारदार तरुणी ही कल्याण येथे राहते. ती सध्या माटुंगा येथील रुपारेल कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे. सोमवारी ६ जानेवारीला ती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी कल्याण येथून निघाली होती. सकाळी आठ वाजून नऊ मिनिटांनी तिने लेडीज स्पेशल सीएसएमटी-दादर लोकलने प्रवास केला होता. साडेनऊ वाजता ती दादर रेल्वे स्थानकात आली. माटुंग्याला जायचे असल्याने ती पश्चिम रेल्वेच्या मोठ्या ब्रिजवरुन जात होती. याच दरम्यान तिला काहीतरी कापल्याचा आवाज तसेच टोचल्याचे जाणवले होते. त्यामुळे तिने मागून वळून पाहिले असता एक तरुण तिला बाजूला करुन घाईघाईने जाताना दिसून आला.
बुकींग ऑफीसजवळ आल्यानंतर तिला तिच्या कपड्यावर तसेच खाली केस पडल्याचे दिसून आले. केसावरुन हात फिरविला असता तिला तिचे अर्ध केस कापल्याचे दिसून आले. पळून गेलेल्या व्यक्तीने तिचे केस कापून पलायन केले होते. त्यानंतर तिने मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात माथेफिरु तरुणाविरुद्ध १३३ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर दादर रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.