मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 डिसेंबर 2025
मुंबई, – दादर येथील एका हिरे व्यापार्याच्या घरी त्यांच्याच नोकराने हातसफाई करुन सुमारे 28 लाखांचे सोन्याचे, हिर्याचे विविध दागिन्यांसह कॅश असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिरजू कमल मुखिया या नोकराविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीनंतर बिरजू हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना 11 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत दादर येथील गोखले रोड, विजय मांजरेकर मार्गावरील सरस्वती धाम इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 201 मध्ये 44 वर्षांचे तक्रारदार भावेश बाबूलाल शहा हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा हिर्यांसह स्टॉक मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे बिरजू मुखिया आणि कला नावाचे दोनजण घरकाम करतात. बिरजू हा दिवसभर काम करुन रात्रीच्या वेळेस फ्लॅटबाहेर झोपतो. ते त्यांच्या घरातील बेडरुमच्या कपाटातील तिसर्या कप्प्यात घरातील सर्व सोन्याचे, हिरेजडीत दागिने आणि कॅश ठेवतात.
11 नोव्हेंबरला त्यांनी कपाटातील दागिन्यांसह कॅशची पाहणी केली होती. त्यावेळेस सर्व दागिने आणि कॅश ड्राव्हरमध्ये सुरक्षित होते. शनिवारी 6 डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता दागिन्यांची पाहणी केली असता त्यांना त्यात 28 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यात एक लाखांची कॅश आणि 27 लाख 20 हजार रुपयांचे विविध सोन्याचे तसेच हिरेजडीत दागिन्यांचा समावेश होता. या चोरीनंतर त्यांनी दोन्ही नोकरांची चौकशी केली होती,
मात्र त्यांनी या दागिन्यांसह कॅशबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यांच्या घरी त्यांच्या वैयक्तिक कोणीही येत नसल्याने त्यांनी बिरजू मुखिया यानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनतर पोलिसांनी बिरजू मुखिया याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बिरजू हा चोरीनंतर घरातून पळून गेला आहे. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.