एक लाखांचा लाचेचा पहिला हप्ता घेणार्या खाजगी व्यक्तीला अटक
पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रार अर्जावर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच गोठविण्यात आलेले बँक खाते पुन्हा करण्यासाठी दहा लाखांची लाचेची मागणी करुन एक लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना गौरव रामशिरोमणी मिश्रा या खाजगी व्यक्तीला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ अटक केली. ही लाच गौरवने दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे याच्या सांगण्यावरुन घेतली होती. त्यामुळे राजेश गुहाडे याच्याविरुद्ध पोलिसांनी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. शुक्रवारी या कारवाईने दहिसर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदार व्यावसायिक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज आला होता. या अर्जाची शहानिशा करण्याचे आदेश पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे याला देण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने दहिसर पोलिसांनी तक्रारदाराच्या कंपनीचे बँक खाते गोठविले होते. त्यामुळे त्यांना या बँक खात्यातून आर्थिक व्यवहार करता येत नव्हते. याबाबत त्यांनी बँक मॅनेजरची भेट घेतली असता त्यांनी त्यांना पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे यांचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांच्याशी बोलण्यास सांगितले होते. त्यामुळे ते दहिसर पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे याची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे एक तक्रार अर्ज आला होता. या अर्जावर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच बँक खाते पुन्हा सुरु करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे दहा लाखांच्या लाचेची मागणी केली होती. दहा लाखांची रक्कम मोठी असल्याने ती देणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे त्यांनी त्याला पाच लाख रुपये देण्याचे मान्य केले होते.
लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी गुरुवारी १८ एप्रिलला वरळीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाऊन उपनिरीक्षक राजेश गुहाडे याच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची या अधिकार्याकडून शाहनिशा करण्यात आली होती. यावेळी तक्रारदाराने त्यांना तीन लाख रुपये देण्याचे मान्य करुन शुक्रवारी एक लाखांचा पहिला हप्ता घेऊन येतो असे सांगितले. त्यानंतर या अधिकार्यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्याजवळ साध्या वेशात सापळा लावला होता. लाचेचा एक लाखांचा पहिला हप्ता घेऊन तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी राजेश गुहाडे याने ती रक्कम गौरव मिश्राकडे देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ती रक्कम गौरवला दिली. यावेळी या अधिकार्यांनी एक लाखांची लाच घेणार्या गौरवला अटक केली. चौकशीत त्याने ती रक्कम राजेश गुहाडे याच्या सांगण्यावरुन घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत उपनिरीक्षक राजेश गुहाडे याची विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.