अपघातात मृत्यू झालेल्या वयोवृद्ध महिलेला रस्तावरुन टाकून पलायन

दहिसर येथील घटना; बाईकस्वारासह रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ जून २०२४
मुंबई, – अपघातात मृत्यू झालेल्या लक्ष्मी कमला सायनी या ७५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. या महिलेला हॉस्पिटलमध्ये न नेता तिचा मृतदेह भिवंडी येथील रस्त्यावरुन फेंकून रिक्षाचालकाने पलायन केले. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी बाईकस्वारासह रिक्षाचालकाविरुद्ध अपघातासह अपघाताचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

गणेश माणिक जांबुळे हा बोरिवलीतील शिंपोली परिसरात राहत असून मृत लक्ष्मी ही त्याची आजी आहे. ३० मेला सकाळी ती घराबाहेर निघून गेली. रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही. त्यामुळे गणेशसह त्याच्या कुटुंबियांनी लक्ष्मी यांचा शोध घेतला. नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र त्यांना कुठेच लक्ष्मी सापडल्या नाही. त्यामुळे त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तिची मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना दहिसर ब्रिज रात्री अकरा वाजता एक अपघात झाल्याची माहिती पोलिसांना समजली होती. अज्ञात बाईकस्वाराने एका वयोवृद्ध महिलेला धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. अपघातानंतर बाईकस्वार पळून गेला होात. जखमी झालेल्या महिलेला लोकांनी एका रिक्षात बसविले आणि रिक्षाचालकाला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन विनंती केली होती. त्यानंतर रिक्षाचालक तेथून निघून गेला होता. या माहितीनंतर गणेशसह त्याच्या नातेवाईकांनी परिसरातील सर्व हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. दुसर्‍या दिवशी बोरिवली पेालिसांनी गणेशला फोन करुन नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे शिलोत्तर, कामण-भिवंडी रोडवर एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला आहे. तिचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ते सर्वजण तिथे गेले होते. मृत महिलेचा मृतदेह पाहिल्यानंतर तो मृतदेह त्याच्याच आजीचाच असल्याचे त्याने ओळखले. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. ओळख पटल्यानंतर लक्ष्मीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

लक्ष्मी हिला एका अज्ञात बाईकस्वाराने धडक दिल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिला वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल न करता रिक्षाचालकाने तिला कामण-भिवंडी रोडवर आणून रस्त्यावरुन तिला टाकून पलायन केले. त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्याने अपघाताचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करुन घटनास्थळाहून पलायन केले. हा प्रकार उघडकीस येताच लक्ष्मीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बाईकस्वारासह तिचा मृतदेह भिवंडी येथे नेऊन अपघाताचा पुरावा नष्ट करणार्‍या रिक्षाचालक अशा दोघांविरुद्ध एमएचबी पोलिसांनी २७९, ३०४ अ, ३३७, ३३८, २०१ भादवी सहकलम १८४, १८७ मोटार वाहन अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या बाईकस्वारासह रिक्षाचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page