मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका स्कूल बसच्या धडकेने मोहन श्रीधर मुळीक या ७१ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी बसचालक अरविंद गणपत कापसे याला अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. अपघातानंतर अरविंद कापसे हा घटनास्थळाहून पळून न जाता त्याने जखमी मोहन मुळीक यांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तिथे उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसात वाजता दहिसर येथील अशोकवन, हनुमान मंदिराजवळ झाला. कुणाल मोहन मुळीक हा बोरिवलीतील काजूपाडा परिसरात राहत असून मालाड येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. मृत मोहन हे त्याचे वडिल असून ते गेल्या पाच वर्षांपासून अशोकवन येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. गुरुवारी सकाळी सात वाजता मोहन हे नेहमीप्रमाणे घरातून कामावर गेले होते. सकाळी आठ वाजता कुणालला त्याच्या बहिणीचा मुलगा मिथिलेश चव्हाणचा फोन आला होता. त्याने आजोबांचा कामावर जाताना अपघात झाला असून त्यांना शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे कुणाल हा शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथे त्याला त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजले.
चौकशीअंती त्याचे वडिल मोहन मुळीक हे कामावर जात असताना सकाळी साडेसात वाजता हनुमान मंदिराजवळ एका स्कूल बसने त्यांना धडक दिली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. यावेळी बसचा चालक अरविंद कापसे हा त्यांना घेऊन रिक्षातून शताब्दी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघाताची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कुणाल मुळीक याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी स्कूल बसचालक अरविंद कापसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.