डंपर अपघातात बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

दहिसर येथील अपघात; चालकास अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – टर्न घेताना डंपरची धडक लागून एका बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अमीत चौहाण असे या मृत मुलाचे नाव असून अपघातानंतर पळून गेलेल्या डंपरचालकाला मिरारोड येथून दहिसर पोलिसांनी अटक केली. रणजीत यादव असे या चालकाचे नाव असून त्याला शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.

हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता दहिसर येथील गर्टनपाड्याजवळील इमारतीसमोर झाला. अमीत हा त्याच्या पालकांसोबत दहिसर पूर्वेला राहत होता. याच परिसरातील एका शाळेत तो नववीत शिकत होता. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता तो दूध आणण्यासाठी दुकानात जात होता. गर्टनपाडा परिसरातून जात असताना एका इमारतीजवळ टर्न घेणार्‍या डंपरने त्याला धडक दिली होती. या अपघातात अमीत हा गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघातानंतर डंपरचालक त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रणजीत यादवला मिरारोड येथून पोलिसांनी अटक केली. अपघातानंतर तो प्रचंड घाबरला. स्थानिक रहिवाशांकडून मारहाण होण्याची भीती वाटल्याने तो अपघातानंतर पळून गेल्याचे सांगितले. अटकेनंतर त्याला मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. त्याने डंपर चालविताना मद्यप्राशन केले होते का याचा पोलीस तपास करत आहे. दरम्यान शनिवारी त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page