मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 डिसेंबर 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने बाईकला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा दहिसर परिसरात घडली. झहीर रमजान अमलानी आणि त्याचा इर्शाद हुसैन अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. हा अपघात शनिवारी रात्री उशिरा पावणेदोन वाजता दहिसर येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, दहिसर मेट्रो स्टेशनजवळील ब्रिजवरील उत्तर वाहिनीवर झाला.
नाझमीन रमजान अमलानी ही 48 वर्षांची महिला मिरारोड येथे राहत असून मृत झहीर हा तिचा मुलगा आहे. नाझमीन आणि झहीर हे दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. शनिवारी तो नेहमीप्रमाणे त्याच्या कामावर निघून गेला होता. रात्री साडेबारा वाजेपर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे तिने त्याला कॉल केला होता. यावेळी त्याने काम संपवून घरी येत असल्याचे सांगून त्याच्यासोबत त्याचा मित्र इर्शाद हुसैन असल्याचे सांगितले. रात्री ते दोघेही त्यांच्या बाईकवरुन घरी जाण्यासाठी निघाले.
रात्री पावणेदोन वाजता ही बाईक दहिसर मेट्रो स्टेशनजवळील उत्तर वाहिनीवरुन जात होती. यावेळी भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. त्यात त्यांची बाईक स्लीप झाली होती. ते दोघेही खाली पडल्यानंतर त्यांच्या अंगावर वाहन गेले होते. त्यात झहीर आणि इर्शाद हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी दोघांनाही पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर नाझमीन अमलानी आणि इर्शादच्या पालकांना देण्यात आली होती. या माहितीनंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांकडून नाझमीनला अपघाताची माहिती समजली होती. तिच्या तक्रारीवरुन दहिसर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून दोन तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान झहीर आणि इर्शाद यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.