डंपरच्या धडकेने 28 वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपी चालकास अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 मार्च 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका डंपरच्या धडकेने 28 वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाला. अब्दुल अस्लम शेख असे या मृत बाईकस्वाराचे नाव असून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी डंपरचालकास दहिसर पोलिसांनी अटक केली. अपघातानंतर आरोपी वाहनचालक जखमी बाईकस्वाराला कोणतीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती न देता पळून गेला होता, मात्र गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हा अपघात सोमवारी 16 मार्चला दुपारी सव्वाच्या सुमारास दहिसर येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, श्रीकृष्णा हॉटेलसमोरील उत्तर वाहिनीवर झाला. अब्दुल हा अंधेरीतील जुहूगल्ली, अब्दुल रेहमान चाळीत त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. सोमवारी तो अंधेरी येथून दहिसर परिसरात कामानिमित्त त्याच्या बाईकवरुन आला होता. दुपारी सव्वाच्या सुमारास ही बाईक श्रीकृष्णा हॉटेलसमोरील उत्तर वाहिनीवरुन जात होती. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका डंपरने त्याच्या बाईकला जोरात धडक दिली होती. त्यात अब्दुल हा गंभीररीत्या जखमी झाला होता.

स्थानिक लोकांकडून अपघाताची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या अब्दुलला पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती नंतर अब्दुल शेखच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी शताब्दी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती.

याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका बाईकस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अपघातानंतर पळून गेलेल्या आरोपी डंपरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुन्ह्यांतील वाहन पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page