जुन्या वादाचा सूड घेण्यासाठी दारु पाजून केला हल्ला

पूर्ववैमस्नातून तिघांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – जुन्या वादाचा सूड घेण्यासाठी दारुच्या पार्टीचे निमंत्रण देऊन एका तरुणासह त्याच्या दोन मित्रांवर दोघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दहिसर परिसरात घडली. या हल्ल्यात अक्षय संजय डोंगरे व त्याचे दोन मित्र समाधान माळी आणि सुरज जाधव हे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन दोन्ही हल्लेखोर तरुणांना अटक केली आहे. रामेश्वर बाळासाहेब ठेंगे आणि कपिल सुरेश माने अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टो पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना बुधवारी 9 एप्रिलला पहाटे साडेसहा वाजता दहिसर येथील एस. एन दुबे रोड, एमएचबी कॉलनी, सरदार वल्लभभाई पटेल कॉलेजसमोर घडली. अक्षय डोंगरे हा मिरारोडच्या सह्याद्रीनगर, शाली भद्राग्राम सोसायटीमध्ये राहतो. रामेश्वर आणि कपिल हे दोघेही त्याचे मित्र असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर या दोघांनी अक्षय डोंगरेवर सूड घेण्यासाठी एक योजना बनविली होती. जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याला दारुच्या पार्टीचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे अक्षय डोंगरे हा त्याचे दोन मित्र समाधान आणि सुरज यांच्यासोबत बुधवारी दहिसर चेकनाका येथे गेला होता. त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी रामेश्वर आणि कपिल या दोघांनी या तिघांनाही सरदार वल्लभभाई पटेल कॉलेजजवळ आणले होते. तिथे त्यांनी त्यांना बिअर पाजण्यास प्रवृत्त केले होते.

बिअर प्यायल्यानंतर या दोघांनी अक्षयवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी अक्षयला वाचविण्याचा समाधान आणि सुरज यांनी प्रयत्न केला असता या दोघांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्यांच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर रामेश्वर आणि कपिल हे दोघेही तेथून पळून गेले होते. ही माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी तिघांनाही पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी अक्षय डोंगरे याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.

या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही हल्लेखोराविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या या दोन्ही आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रामेश्वर ठेंगे आणि कपिल माने या दोघांना दहिसर येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page