कौटुंबिक वादातून मायलेकीवर ब्लेडने प्राणघातक हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत पित्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून झोपेत असलेल्या मायलेकीवर ब्लेडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. या हल्ल्यात 33 वर्षांची महिलेसह तिची चौदा वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. त्यांच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन तिच्या आरोपी पित्याविरुद्ध दहिसर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत 36 वर्षांच्या पित्याला पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. आरोपी त्याच्या पत्नीच्या चारित्र्याव संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. त्यातून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रविवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
ही घटना रविवारी 30 नोव्हेंबरला रात्री उशिरा सव्वादोन वाजता दहिसर येथील कोकणीपाडा परिसरात घडली. याच परिसरात चौदा वर्षांची तक्रारदार मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. तिची आई दहिसर येथील एका खाजगी कंपनीत डायमंड सॉर्टर म्हणून कामाला आहे तर ती त्याच परिसरातील एका शाळेत आठवीत शिकते. तिचे वडिल हे पेस्ट कंट्रोलचे काम करत असून त्यांना दारु पिण्याचे व्यसन आहे. तिच्या वडिलांनी तिची आई कोणीशी बोलते, फिरायला जाते तसेच मोबाईल बोलते म्हणून आवडत नाही. तो तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. अनेकदा तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. या भांडणात तिने मध्यस्थी केली तर तो तिलाही मारहाण करत होता.
मारहाणीत तो त्यांना झोपेतच त्यांची हत्या करुन स्वत आत्महत्या करणार असल्याची धमकी देत होता. या धमकीसह मारहाणीबाबत तिच्या आईने त्याच्याविरुद्ध दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. तरीही त्याच्यात काहीच सुधारणा झाली नव्हती. त्याच्या या मानसिक व शारीरिक शोषणाला तिने वांद्रे येथील कौटुंबिक कोर्टात घटस्फोटसाठी अर्ज केला होता. तरीही तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. गेल्या एक महिन्यांपासून तिची आजी त्यांच्याकडे उपचारासाठी आली होती. 29 नोव्हेंबरला तिच्या आईचा वाढदिवस होता. त्यामुळे घरातील सर्वजण बाहेर जेवायला गेले होते. मात्र तिचे वडिल आले नव्हते.
रविवारी दुपारी तीन वाजता तिची आई घटस्फोटाबाबत वकिलाला भेटायला गेली होती. रात्री आठ वाजता ती घरी आली होती. यावेळी तिच्या वडिलांनी तिला इतका वेळ कुठे गेली होती अशी विचारणा केली हातेी. याच कारणावरुन त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. रागाच्या भरात तिने त्यांच्या भांडणाला कंटाळून घर विकून मुलीला घेऊन निघून जाणार असल्याचे सांगितले होते. त्याचा राग आल्याने रागाच्या भरात त्याने तिला संपविण्याची धमकी दिली होती. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. रात्री दहा वाजता जेवण करुन ती तिच्या आईसोबत पोटमाळ्यावर झोपण्यासाठी गेली होती. यावेळी तिची आजी तळमजल्यावर झोपली होती तर तिचे वडिल बाहेर गेले होते. रात्री घरी आल्यानंतर त्याने तिच्या आईशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली होती.
काही वेळानंतर त्याने तिच्यासह तिच्या आईच्या गळ्यावर, पोटावर आणि मानेजवळ ब्लेडने वार केले होते. त्यात त्या दोघीही जखमी झाले. स्थानिक रहिवाशांना ही माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली होती. ही माहिती नंतर दहिसर पोलिसांना देण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी दोघींना पोलिसांनी तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
याप्रकरणी तिच्या जबानीवरुन पोलिसांनी तिच्या वडिलांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.