मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 डिसेंबर 2025
मुंबई, – पूर्ववैमस्नातून आरिफ रुकमद्दिन शेख या 32 वर्षांच्या तरुणावर नऊजणांच्या एका टोळीने लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाणकरुन तलवार, चाकू आणि दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात आरिफ हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केली आहे. रोमन नाजीर शेख आणि दिपक जितेंद्र दुबे अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सातजणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्यात सनी सालेकर, शेखर पल्लक, विकी निनामिया, विशाल गोडसे, अरविंद ऊर्फ लालासह इतर दोघांचा समावेश आहे.
ही घटना शनिवारी मध्यरात्री साडेतीन वाजता दहिसर येथील आनंदनगर, स्वामी नारायण मंदिरजवळील बीएमसी कचरा व्यवस्थापन चौकीच्या आवारात घडली. आरिफ शेख हा बोरिवलीतील न्यू लिंक रोड, भरत कंपाऊंड परिसरात राहतो. शनिवारी रात्री तो त्याच्या मित्र जय समनगुडी, कुणाल एलंगे आणि सुरेंद्र राठोड यांच्यासोबत दहिसर येथे आला होता. सनी सालेकर हा त्याच्या परिचित असून त्यांच्यात एक जुना वाद होता. याच वादातून सनीने त्याच्या इतर आठ मित्रांच्या मदतीने बीएमसी कचरा व्यवस्थापन चौकीजवळ आरिफला पकडले होते. त्याच्याशी जुन्या वादातून भांडण काढून पुन्हा वाद घालण्याचा प्रयत्न केला होता.
या वादानंतर काही कळण्यापूर्वीच या टोळीने त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. तसेच त्याच्यावर दगडासह चाकू आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला होत. त्यात त्याच्या पोटाला आणि चेहर्याला गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेला आरिफ जागीच कोसळताच ते सर्वजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. आरिफच्या मित्रांकडून ही माहिती प्राप्त होताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी झालेल्या आरिफला तातडीने शताब्दी आणि नंतर कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरिफची जबानी नोंदवून पोलिसांनी नऊ हल्लेखोराविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल रोमन शेख आणि दिपक दुबे या दोघांना दहिसर येथून पोलिसांनी अटक केली तर इतर सातजणांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.