वयोवृद्धाची फसवणुक करणार्या ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाला अटक
न्यूझीलंड टुरसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दहिसर येथे राहणार्या एका वयोवृद्धाची फसवणुक केल्याप्रकरणी तेजस महेंद्र शहा या ट्रॅव्हेल्स व्यावसायिकाला दहिसर पोलिसांनी अटक केली. न्यूझीलंड टुरसाठी घेतलेल्या साडेपाच लाखांचा अपहार करुन तक्रारदार वयोवृद्धाची फसवणुक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.
महेंद्र लल्लूभाई पांचाळ हे ६१ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार त्यांच्या पत्नीसोबत दहिसर येथे राहतात. त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून वसईतील कामन परिसरात त्यांचे एक खाजगी कार्यालय आहे. जून २०२३ रोजी त्यांना त्यांच्या पत्नीसोबत विदेशात फिरायला जायचे होते. याच दरम्यान त्यांना एका गुजराती वर्तमानपत्रात पूर्वा हॉलिडेज टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्स कंपनीची एक जाहिरात दिसली होती. त्यात तेजस शहा याचा मोबाईल क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला होता. यावेळी त्याने त्यांना न्यूझीलंड पॅकेजची माहिती देताना त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला ५० टक्के सूट देतो असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून विमान तिकिट, हॉटेलमध्ये राहण्याचे, खाण्या-पिण्यासह इतर कामासाठी साडेपाच लाख रुपये घेतले होते. ही रक्कम त्यांनी त्याच्या सांगण्यावरुन एका बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. मात्र टूरसाठी दोन दिवस शिल्लक असताना तेजसने अचानक टुर रद्द केली होती. याबाबत कुठलेही कारण त्याच्याकडून देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे साडेपाच लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्याने दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आला होता. वारंवार कॉल करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याने त्यांचा कॉल ब्लॉक केला होता.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच महेंद्र पांचाळ यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तेजस शहाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या तेजस शहाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले. आतापर्यंतच्या तपासात तेजसच्या मालकीचे दहिसर येथे पूर्वा हॉलिडेज नावाचे एक ट्रॅव्हेल्स कंपनी आहे. त्याने अनेकांना विदेशात टूर आयोजित करतो असे सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले होते. मात्र अचानक टुर रद्द करुन कोणालाही पैसे न देता त्यांची फसवणुक केली होती. त्याच्याविरुद्ध अशाच फसवणुकीचे काही गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती.