स्वतच्या मुलींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणार्या मातांना अटक
दहिसर गुन्हे शाखेने कारवाई करुन तीन तरुणींची सुटका केली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – आर्थिक परिस्थितीला कंटाळून दोन महिलांनी स्वतच्या दोन मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. ऑनलाईन चालणार्या या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी दोन मातांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. मेडीकलनंतर या तिघींना कांदिवलीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दोन्ही महिलांना अटक करुन पुढील चौकशीसाठी दहिसर पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले.
शहरातील विविध हॉटेल, लॉज आणि गेस्टहाऊसमध्ये काही महिला ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्यासोबत त्यांच्या परिचित तरुणींना वेश्याव्यवसायासाठी पाठवत असल्याची माहिती युनिट बाराच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती. फोनवरुनच आर्थिक व्यवहार केल्यानंतर तिला काही तरुणींना घेऊन दहिसर येथील एका फॅमिली रेस्ट्रॉरंटमध्ये बोलावण्यात आले. ठरल्याप्रमाणे बुधवारी तिथे दोन महिला तीन तरुणींसोबत आल्या होत्या.
बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन गवस, पोलीस निरीक्षक राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक रासकर, पोलीस उपनिरीक्षक सावंत, सहाय्यक फौजदार खान, चव्हाण, लिम्हण, पोलीस हवालदार सावंत, राणे, बने, महिला पोलीस हवालदार गोसावी, पडवळ, पोलीस हवालदार मोरे, शैलेश बिचकर, गोम, गोरुले, पोलीस शिपाई शिरसाठ, धोत्रे, ढाके आदी पथकाने टाकून या दोन्ही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून त्यातील एक तरुणी अल्पवयीन तर दोन तरुणी त्यांच्याच मुली असल्याचे उघडकीस आले.
आर्थिक परिस्थितीसह गरीबीला कंटाळून त्यांची आई त्यांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेनंतर या दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, पिटा आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्या दोघीही पोलीस कोठडीत आहे. तिन्ही तरुणींना मेडीकलनंतर कांदिवलीतील बोईसरच्या महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले.