तक्रार मागे घेण्यासाठी अपहरण करुन खंडणीसाठी धमकी
तीन नातेवाईकांसह आठजणांविरुद्ध गुन्हा तर एका आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मे 2025
मुंबई, – बोगस दस्तावेजाच्या मदतीने फ्लॅटची विक्री करुन फसवणुक केल्याची तक्रार मागे घेण्यासाठी एका 36 वर्षांच्या व्यक्तीची त्याच्या नातेवाईकांनी अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करुन खंडणीसाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन नातेवाईकासह आठजणांविरुद्ध दहिसर पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बाबासाहेब सिताराम हनवते, ठकाराम सिताराम हनवते, मनोज राजू वाघमारे, आनंद संजय पासवान, टकला, दिपक, विशाल आणि दादा अशा आठजणांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत आनंद पासवान याला पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बीडचे रहिवाशी असलेले 36 वर्षांचे तक्रारदार मिरारोडच्या सेक्टर पाच, शांतीनगरचे रहिवाशी आहेत. बाबासाहेब आणि ठकाराम हे दोघेही त्याचे मामा तर मनोज वाघमारे हा त्यांचा मावस भाऊ आहे. ते सर्वजण कांदिवलीतील चारकोपच्या सेक्टर एक, अनिरुद्ध सहकारी सोसायटीमध्ये राहतात. त्यांचे नातेवाईक कांदिवली परिसरात राहत असल्याने त्यांनी तिथे एक थ्री बीएचकेचा एक फ्लॅट खरेदी केला होता. बाबासाहेबने काही लोकांकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे 2017 साली त्याचा फ्लॅट नावावर करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी फ्लॅट नावावर करण्यास नकार दिला होता. त्याचा राग आल्याने त्याने एका अल्पवयीन मुलीच्या मदतीने त्याच्याविरुद्ध चारकोप पोलिसांत लैगिंक अत्याचारासह पोक्साो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत नंतर तक्रारदाराला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर ते मार्च 2017 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये होते. त्याचा फायदा घेऊन बाबासाहेब, विठ्ठल हनवते यांनी इतर आरोपींच्या मदतीने त्यांच्या फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटची हरजीतसिंग बेदीसह इतरांना विक्री केली होती. जामिनावर बाहेर आल्यानतर हा प्रकार समजताच त्यांनी बाबासाहेब हनवते, सुखजीतसिंग बेदी, गुरुजीतसिंग बेदी, विठ्ठल हनमते, बँक मॅनेजर मिनाक्षी सोहने आणि सोसायटीचे सेक्रेटरी प्रशांत परेरा व संगीता पंडित यांच्याविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित नऊजणांविरुद्ध पोलिसांनी 406, 420, 467, 471, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींकडून त्यांच्यावर सतत दबाब आणला जात होता. अटकेच्या भीतीने त्यांनी दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. गुरुवारी 8 मेला आरोपींच्या याचिकेवर सुनावणी होणार होती, त्यामुळे ते स्वत दिडोंशी कोर्टात जाण्यासाठी निघाले गेले होते.
सायंकाळी ते त्यांच्या अॅक्टिव्हाने दहिसर येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशनखालून जाताना एका स्विफ्ट कारने त्यांना ओव्हरटेक केले. त्यातून उतरलेल्या चौघांनी त्यांना कारमध्ये कोंबून वसईच्या दिशेने नेले. यावेळी त्यांना संबंधित व्यक्तीने बेदम मारहाण केली. आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. वसईतील सातीवली येथे आणल्यानतर ठकाराम, मनपोज वाघमारे यांच्यासमोर इतरांनी त्यांना लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. मारहाणीचा व्हिडीओ त्यांनी बाबासाहेब हनवते यांना पाठविला होता. त्याने तक्रार मागे घेत नसेल तर आणखीन मारहाण करा असे सांगितले होते.
जिवाच्या भीतीने त्यांनी केस मागे घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर ते त्यांना घेऊन दहिसर येथे आले. त्यांची सुखरुप सुटका करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला फोनवरुन ही माहिती सांगून पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची पत्नी आणि नातेवाईक पैसे घेऊन तिथे आले होते. हा प्रकार तिथे उपस्थित लोकांच्या समजताच त्यांनी त्यांना मारहाण केली. यावेळी इतर चारजण पळून गेले तर आनंद संजय पासवान याला लोकांनी पकडून समतानगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
घडलेल्या प्रकाराची माहिती दहिसर पोलिसांना दिल्यानंतर त्यांच्या जबानीवरुन संंबंधित आरोपीविरुद्ध अपहरणासह खंडणीसाठी धमकी देणे, बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत मनोज वाघमारे याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने तक्रारदाराचे बाबासाहेब हनवते, मनोज वाघमारे आणि ठकाराम हनवते यांच्या सांगण्यावरुन अपहरण केले होते. त्यासाठी त्याला टकला, दिपक, विशाल आणि दादा यांनी मदत केली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर आठजणांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.